कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दत्त वेळी सत्ता आणणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील हे राज्यातील सत्तेत विरोधी पक्षात असतानाही सहा महिन्यापूर्वी पर्यंत सत्तेत असताना मैत्रीचे आदर्श उदाहरण कोल्हापूर जिल्ह्याला घालून देत होते. मात्र, गोकुळची निवडणूक सरल्यानंतर आता या दोघातील मैत्रीत अंतर पडले असून त्यामध्ये जातीयवादाचे विरजण पडले आहे. गोकुळच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जातीयवादी राजकारण झाल्याचा थेट आरोप करत कोल्हापूरच्या राजकारणात नवा वाद पेटवला आहे. नंदुरबार येथे बोलताना मुश्रीफ यांनी माझ्या मुलाला या निवडणुकीत लक्ष्य करण्यात आले. सतेज पाटील यांनी जातीयवादी प्रचार केला होता, असा आरोप केला.

नवीद विरोधात जातीयवाद

काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवते पण त्यांनी सुपुत्र नवीद मुश्रीफ यांच्या विरोधात जातीयवादी प्रचार केला. माझी चूक झाली. सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवायला हवी होती. मात्र आरक्षित जागेवरून ती लढवली गेली, असेही त्यांनी कबूल केले.

महायुतीची मते जास्त

तसेच, मतांची सरासरी पाहिली तर आमच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीला ६५ हजार १४४ मते मिळाली. तर समविचारी आघाडीला ६३ हजार ३३९ मते मिळाली. त्यामुळे विजय तांत्रिकदृष्ट्या त्यांचा असला तरी जनतेचा कौल आमच्याच बाजूने होता, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला.

स्वबळावर अध्यक्ष करा

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांना कोणतेही सहकार्य करणार नसल्याचे स्पष्ट करून मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटील यांनी स्वबळावर अध्यक्ष निवडून आणून दाखवावा, असे खुले आव्हान दिले.

आता जातीयवादी झालो ?

याला आमदार सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे, पाटील म्हणाले जेव्हा गोकुळच्या अध्यक्षपदासाठी नवीद मुश्रीफ यांच्या नावाचे पाकीट मी दिले होते. तेव्हा मी जातीवादी नव्हतो का. त्यावेळी मी धर्मनिरपेक्ष होतो आणि आता जातीयवादी झालो का, असा सवाल त्यांनी केला.

षडयंत्र तपासा

मुश्रीफ यांनी जातीयवादावर ज्यांच्याबाबत बोलायला पाहिजे; त्यांच्यावर ते बोलत नाहीत. पण ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर बोलत नाहीत. त्यांच्या मुलाला कुणी कुणी पाडले हे त्यांनाही माहिती आहे. त्यांनी याचे आत्मचिंतन करावे. आमच्याकडे ४४०० ठराव होते असा दावा करणाऱ्यांनीच षडयंत्र केले का हे तपासावे, असा टोला त्यांनी लगावला.

जनक्षोभ निर्माण होईल

तसेच आज अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १४ ची गणपूर्ती लागते. पण महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिले. शेतकऱ्यांसाठी लढत असल्याचे मुश्रीफ म्हणत असतील तर सभेला त्यांच्या संचालकांनी यायला पाहिजे होते. गोकुळ मध्ये मी काही माझा मुलगा अध्यक्ष होणार नव्हता, असा टोला त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या मुलगा नवेद मुश्रीफ यांच्या राजकीय घडामोडीवरून केला. मी शेतकऱ्यांसाठी गोकुळ वाचला पाहिजे म्हणून लढतोय. देशाला नव्हे तर आता जगाला माहिती झाले आहे. आमच्याकडे बहुमत आहे. अध्यक्ष निवडू दिला नाही तर जनक्षोभ निर्माण होईल. यांना गोकुळ बंद पाडायचा आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.