कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला रंग येऊ लागला आहे तशी विविध पक्षीय नेत्यांची विधानेही चर्चेत येत आहेत. महायुतीचे नेते हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. सतेज पाटील यांनी महायुतीवर नेत्यांवर टीका केली आहे..तर राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष आमदार अमल महाडिक यांनी मंगळवारी महायुतीच्या नेत्यांनी सामंजस्याचा निर्णय घ्यावा, असे म्हणत सतेज पाटील यांच्याशी जवळीक साधल्याचे दिसून आले.
आधीच गोकुळच्या निवडणुकीसाठी जागा वाटपावरून मतभेद वाढीस लागले असताना नेत्यांच्या उलट सुलट विधानामुळे गोंधळात भर पडत आहे.
गोकुळ मध्ये अध्यक्षपद भूषवलेले विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हे मागील आमच्या आघाडीत माझ्या आणि हसन मुश्रीफ यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसायचे. आता ते महायुती नेमके कुठे आहेत हे माहीत नाही. त्यांची काय अवस्था झाली हे संपूर्ण जिल्हा पाहत आहे. त्यांना आता महायुतीत शोधण्याची वेळ आली आहे.
ज्येष्ठ असूनही महायुतीत त्यांचा मान-सन्मान किती ठेवला जातोय हे यातून दिसून येते, असा टोला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी लगावला. महायुतीत सावळा गोंधळ सुरू असून एकमेकांची कॉलर धरण्यापर्यंत आणि महापालिकेच्या चौकात परस्परांवर शड्डू मारण्यापर्यंतचा सुसंवाद महायुतीत सुरू आहे, असा चिमटा त्यांनी काढला. या विधानावरून खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचा पराभव नव्हे तर विरोधकांची अनामत रक्कम जप्त होईल. नैराश्यामुळे ते महायुतीच्या पराभवाची भाषा करत आहेत, असा टोला सतेज पाटील यांना उद्देशून लगावला. महायुतीकडे ४४०० ठराव आहेत.
दूध उत्पादकांचा पाठिंबा असल्याने महायुतीचा पराभव होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मार्ग काढला जाईल.
दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लोकशाहीत मतभेद होतात , मनभेद नाही. भाजप कार्यालयात ठरावाची चाचणी करताना थोडा गोंधळ झाला पण आम्ही एकत्र बसून तोडगा काढला आहे. जागा वाटपाबाबत कोणाचाही दबाव नाही. संख्याबळानुसारच जागावाटप होईल. अदृश्य शक्ती आता जागी होणार नाही.
ए. वाय. पाटील राष्ट्रवादीत
दरम्यान गेल्या काही दिवसापासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या संपर्कात असलेले ए. वाय. पाटील हे स्वगृही परतले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यांनी गोकुळ निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी पक्षाच्या या माजी जिल्हाध्यक्षांचे पक्षात स्वागत केले. पाटील हे गोकुळचे उमेदवार झाल्यास राष्ट्रवादीतील जागावाटपाच्या कोंडीत भर पडण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी यावर मिश्कील टिप्पणी केली की, “ए. वाय. राष्ट्रवादीत आल्याने के. पी. पाटील यांना कसे वाटते हे पाहायला आलो आहे. तर, या घडामोडीमुळे राधानगरी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
