कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील ठराव नेमके कोणाचे यावरून महायुतीतील वाद रविवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद दिसून आले. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप कार्यालयाची वाट धरावी लागली. तेथे त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी कार्यकार्यातील मतभेद पुढे आले. पणउभय नेत्यांनी काही घडले नाही असा निर्वाळा दिला असला तरी अंतर्गत तणाव, धुसफूस याचे दर्शन घडले.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीने एकत्र यायचे ठरवले आहे. मतभेद – मनभेद विसरून एकत्र असण्याची सांगितले जात असले तरी अजूनही ठराव धारक नेमके कोणत्या पक्षाचे याची स्पष्टता नसल्याने गोंधळ आहे. हाच मुद्दा वादाचे कारण बनू लागला आहे. आज हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आजरा, गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकी दरम्यान राष्ट्रवादीच्या ठरावाची भाजपकडून पडताळणी का केली जाते, अशी विचारणा करत राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने आक्रमक भूमिका घेतली. या वरून बैठकीत वादावादी झाल्याने सर्व नेते बैठक घेण्यासाठी थेट दुसऱ्या ठिकाणी निघून गेले.चंद्रकांत पाटील यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक हे एकत्र गेले. तर हसन मुश्रीफ हे आपल्या वाहनातून बाहेर पडले. या घडामोडींवरून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चोहोबाजूंनी समोर आले.

एकीचे काय झाले?

गोकुळ दूध संघासाठी महायुतीचे सर्व पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवणार आहेत. महायुतीतील सगळे मनभेद, मतभेद संपले आहेत. महायुतीतील सर्व नेते,अर्ज भरलेले उमेदवार हे उद्या शुक्रवारी सकाळी करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतील. प्रचाराचा नारळ फुटला असे समजून मतदानाच्या संपर्काला सुरुवात केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग येथे स्पष्ट केले होते. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतील सर्व पक्षांची एक बैठक येथील एका हॉटेलमध्ये पार पडली. बैठकीस मंत्री  पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री विनय कोरे, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आधी प्रमुख उपस्थित होते.