कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीची बैठक गणपूर्ती अभावी तहकूब झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. यानंतर झालेल्या बैठकीत समविचारी आघाडीचे बहुमत असल्याने शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला. दरम्यान, अध्यक्ष निवड झाल्याची ही सभा कायदेसंमत आहे का यावरून आता कायदेशीर गुंता,लढा निर्माण झाला आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीसाठी आज बैठकीचे आयोजन गोकुळच्या मुख्यालयात करण्यात आले होते. या बैठकीला समविचारी आघाडीचे सर्व १३ संचालक वेळेवर उपस्थित होते. तथापि, महायुतीचे १२ संचालक अनुपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष निवडीची बैठक सुरू झाली.
कायद्याचा किस
या सभेसाठी उपस्थित असलेल्या १३ संचालकांनी सह्या केल्या होत्या. गोकुळच्या उपविधीप्रमाणे अध्यक्ष निवडीसाठी ५९ टक्के म्हणजे १४ संचालकांची उपस्थिती अनिवार्य ठरते. परंतु, बैठकीला १३ संचालक उपस्थित राहिल्याने गणपूर्ती होत नसल्याच्या कारणास्तव सभा तर तहकूब झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. तथापि या वेळी समविचारी आघाडीच्या संचालकांनी २५ पैकी १३ जागांवर आमचे संचालक आहेत आमचे बहुमत असल्याने अध्यक्षपदी आघाडीच्या संचालकाची निवड करावी असा आग्रह धरला होता. त्यावरून सुमारे तीन तास कायद्याचा कीस पाडला जात होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी या गोकुळच्या मुख्यालयातून बाहेर पडल्या.
यानंतर थोड्या वेळानंतर समविचारी आघाडीचे १३ संचालक विजयाच्या घोषणा देत मुख्य कार्यालयातून बाहेर आले. त्यांनी गोकुळचे दिवंगत अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, महापालिकेतील विरोध पक्षाचे गटनेते राजेश लाटकर यांच्यासह १३ संचालक उपस्थित होते.
अध्यक्ष निवडीचा दावा
बैठकीतील वृत्तांत कथन करताना संचालक शशी तायशेटे यांनी पत्रकारांना सांगितले की, आजच्या बैठकीला आमच्याकडे १३ संचालकांचे बहुमत असतानाही सभा घ्यावी असे आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले. पण तो मुद्दा त्यांनी मान्य केला नाही. परंतु त्यानंतर नवनिर्वाचित १३ संचालकांची बैठक होऊन त्यामध्ये शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमच्याकडे बहुमत असल्याने चुयेकर यांची अध्यक्ष निवड वैध ठरते, असा दावा करण्यात आला.
यापुढे कायद्याची लढाई
शशिकांत पाटील चुयेकर यांनी अध्यक्ष निवडीनंतर अध्यक्ष कार्यालयात प्रवेश केला आहे. उद्यापासून रीतसर कामकाजाला सुरुवात करणार आहोत. गोकुळ दूध संघाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी दूध संकलनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. त्यामुळे आता गोकुळच्या सभेबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे यापुढे कायद्याची लढाई होईल असेही सतेज पाटील बैठकीनंतर म्हणाले.
