कोल्हापूर : राज्य शासनाने सहकारी संघामध्ये शासन नियुक्त प्रतिनिधी नियुक्त करण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून कोल्हापूरचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

सहकारासाठी घातक

कोल्हापूरचा सहकार हा शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांच्या कष्टाचा कणा आहे. मात्र, राजकीय स्वार्थासाठी आणि मागच्या दाराने आपले पुनर्वसन करण्यासाठी शासनाने सहकारी संघांमध्ये शासन नियुक्त संचालक लादण्याचा जो घाट घातला आहे, तो सहकार क्षेत्राला संपवणारा आहे. कोल्हापूरच्या सहकारावर आणि स्वाभिमानावर घातलेला हा घाव जनता कदापि सहन करणार नाही. सत्तेची मस्ती डोक्यात ठेवून जिल्ह्याच्या सहकार संस्कृतीला सुरुंग लावणाऱ्या हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरकर कधीही माफ करणार नाहीत, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे. या दडपशाहीविरोधात कायदेशीर लढा देण्यासोबतच रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू, असा पवित्राही त्यांनी घेतला आहे.

राहुल गांधींचे पाठबळ

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेला सत्तासंघर्ष आता थेट राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. ‘ गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी भाजपला स्पष्टपणे नाकारले असताना, निवडणुकीनंतर नियम बदलून चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रयत्न होत आहे ‘ असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या वादात राहुल गांधी यांनी ट्वीट करत आमदार सतेज पाटील यांच्या भूमिकेला खणखणीत पाठिंबा दिला आहे.

दादांनी बोलणे टाळले

दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर विमानतळावर त्यांच्याशी माध्यमाने गोकुळ सह अन्य मुद्द्यांवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र दादांनी त्यावर काहीही भाष्य केले नाही.

बानगेत पुतळ्याचे दहन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल आणि साखरेसह इथेनॉलची एमएसपी वाढवून मिळावी, यासाठी आंदोलन सुरू असताना राज्यातील महायुती सरकारने निर्णय घेण्यास दिरंगाई चालवले आहे. पण दुसरीकडे ‘गोकुळ’मध्ये शासननियुक्त संचालक निवडीचा निर्णय घाईघाईने घेतला. या पक्षपाती धोरणामुळे बानगे (ता. कागल) येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी एकत्र येत महाराष्ट्र शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. चंद्रशेखर सावंत, वनिता पाटील अ‍ॅड. दयानंद पाटील, सरपंच सुनील बोंगार्डे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.