सत्तांतरानंतर ‘गोकुळ’च्या प्रगतीचा दावा ; वार्षिक उलाढाल ३७८ कोटींनी वाढली; विरोधकांचे आक्षेप

पूर्वीचे आणि विद्यमान सत्ताधारी यांच्यातील आकडेवारीची तुलना केली केली असता गोकुळ दूध संघाची प्रगती झाली आहे.

दयानंद लिपारे, लोकसत्ता 

कोल्हापूर : गोकुळ दुध संघामध्ये सत्तांतर होऊन वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर विद्यमान सत्ताधाऱ्यांनी कारभाराची सकारात्मक चुणूक दाखवली आहे. या आधीच्या वर्षांपेक्षा वार्षिक उलाढाल सुमारे ३८० कोटी तर दूध संकलन सुमारे साडेपाच कोटी लिटर वाढ करून सत्ताबदलाच्या यशाची प्रचिती दिली आहे. याशिवाय अजून काही बाबतीत प्रगतीचा आलेख उंचावताना दिसत आहे.

सत्ताधाऱ्यांच्या कारभाराबाबत विरोधकांकडून उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचे निराकरण करून पारदर्शक कारभाराची हमी देण्याचे कर्तव्य नव्या संचाकाल मंडळ आणि नेतृत्वालाही दाखवावे लागेल. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) राज्यातील सर्वात मोठा दूध संघ आहे. या संघामध्ये गेली २५ वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे प्रभुत्व होते. त्याला विकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांची साथ पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या निवडणुकीत छेद दिला. अध्यक्षपदाची सूत्रे विश्वास पाटील यांच्याकडे सोपवली.  गोकुळ सत्तांतराचे वर्षपूर्ती या आठवडय़ात झाली. या निमित्ताने गोकुळने आढावा घेताना केलेल्या प्रगतीचा आलेख मांडला आहे.

पूर्वीचे आणि विद्यमान सत्ताधारी यांच्यातील आकडेवारीची तुलना केली केली असता गोकुळ दूध संघाची प्रगती झाली आहे.  संघाची वार्षिक उलाढाल २९२९ कोटी झाली  असून ती वर्षांत ३७८ कोटीने वाढलेली आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवताना दूध खरेदी दरात वाढ करण्याचे आश्वासन सतेज पाटील यांनी दिले होते. त्यानुसार या वर्षांमध्ये म्हैस दूध खरेदी दरात ४ तर गाय दूध खरेदी करतात ३ रुपये वाढ केली आहे. दुध संकलन २० लाख लिटर करण्याचा संकल्प केला होता. ६५५६ दूध संघामार्फत साडेपाच लाखापेक्षा जास्त दूध उत्पादक यांच्याकडून गोकुळने वार्षिक दूध संकलन ४९ कोटी ९५ लाख लिटर केले असून ते आधीच्या वर्षांपेक्षा ५ कोटी ३३ लाख लिटरने अधिक आहे. प्रतिदिन दूध संकलन १३ लाख ६८ हजार झाले असून गतवर्षीच्या तुलनेत ते प्रतिदिन दीड लाख लिटरची वाढ केली आहे, असे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

विपणन पद्धतीत बदल

मुंबई, पुणे ही गोकुळची मोठी बाजारपेठ आहे. तेथील दुधाच्या पॅकिंगमधील भेसळ रोखण्यासाठी भक्कम पॉलीथीन पिशवीचा वापर केल्याने ग्राहकांना दर्जेदार व सकस दूध मिळत आहे.  वाहन भाडे हा मागील संचालक मंडळाचा वादग्रस्त कारभार होता. नव्या संचालक मंडळाने मुंबई. पुणे टँकर वाहतूक भाडय़ात ५ कोटी, अतिरिक्त रोजंदारी कर्मचारी कपात पावणेदोन कोटी, महानंद दूध पॅकिंग बचत ६५ लाख, पशुखाद्य वाहतूक भांडे पावणेदोन कोटी अशी सुमारे १० कोटी रुपयांची बचत करून दाखवली आहे. वर्षभरात दूध उत्पादकांना दूध खरेदी दरात दोन वेळा वाढ केली आहे.

पारदर्शकतेच्या हमीची गरज

गोकुळने वर्षभरात बरेच काही ‘ करून दाखवले ‘ असल्याचा दावा सत्ताधारी करीत आहेत. मात्र त्यांच्या कामकाज पद्धतीवर विरोधकांनी आक्षेप घेतले आहेत.  गोकुळच्या कामकाज पद्धतीत पारदर्शकतेचा अभाव आहे. पुरेशी माहिती विरोधकांना दिली जात नाही. गोकुळ दूध संघ आपल्याच ताब्यात ठेवण्याचे राजकारण केले जात आहे, असे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. विरोधकांची टीका म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी विद्यमान संचालकांनी त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन, निराकरण करून पारदर्शक कामकाजाची हमी देण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gokul s annual turnover increased by 378 crores after panel change zws

Next Story
पंचगंगा नदीत मासे मृत; इचलकरंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
फोटो गॅलरी