सांगली : शेतकर्यांना नडणार्या नेत्यांचा बुरखा फाडण्यासाठीच मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली असून सग्यासोयर्यासाठी लाभाची पदे देण्याची प्रवृत्ती मी मोडीत काढणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आ. पडळकर यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत जत तालुका विकास सोसायटी गटातून उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांच्यासोबत आ.सदाभाउ खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक होते.
तत्पुर्वी बैलगाडीतून चाबकासह येउन त्यांनी बँकेत अर्ज दाखल करण्यासाठी प्रवेश केला. यावेळी फटाक्याची आताषबाजी करत कार्यकर्त्यांनी आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. उमेदवारी दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आ. पडळकर म्हणाले, जिल्हा बँक ही सामान्य शेतकर्यांची बँक आहे. मात्र मूठभर लोकांना शे-दोनशे कोटींचे कर्ज आणि शेतकरी मात्र लाखाच्या कर्जासाठी उंबरे झिजवतो. हे यापुढे चालू देणार नाही. बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारही उघडकीस आणून दोषीवर कारवाई व्हावी याचा आग्रह धरणार आहे. एक विशिष्ट धोरण समोर ठेवून निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. माझा कारखाना, सूतगिरणी असे काहीही नाही.
मला कर्ज पाहिजे असे नाही. कारखाने, सूतगिरणीच्या नावावर कोट्यावधींची कर्जे काढायची आणि बुडवायची ही प्रवृत्ती घातक आहे. बँकेला दोनशे कोटींचा नफा होतो, मात्र, आजही बँकेच्या ९० टक्के शाखा भाड्याच्या इमारतीत आहेत. या माध्यमातून कार्यकर्त्यांना पोसण्याचे काम होत आहे असा आरोपही त्यांनी केला. बँकेची निवडणुक अविरोध करण्याचे प्रयत्न चालू आहेत याबाबत विचारले असता याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेच घेतील. मात्र, आम्ही ताकदीने महायुती म्हणून निवडणुक लढविण्यास तयार आहोत असेही आ.पडळकर यांनी सांगितले.
यावेळी आमदार खोत यांनी ही बॅक म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. प्रस्थापितांना केवळ सग्यासोयर्यांनाच सत्तेची पदे द्यायची आहेत. या नेत्यांकडेच मंत्री पदे, जिल्हा परिषद, बँकेचे अध्यक्षपद हवे असते. या गुलामगिरीतून मुक्त होण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे.दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या अंतिम दिवस असून गेल्या चार दिवसात २०४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.आजअखेर ६९३ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे.
