रंकाळा तलाव स्वच्छतेसाठी शासनाची २ कोटींची मदत

तावडे म्हणाले, संस्थेने शाहूंच्या काळात होते तसे रूप रंकाळा तलावास मिळवून द्यावे.

रंकाळा तलावातील प्रदूषित पाणी स्वच्छ झाले पाहिजे, या भूमिकेतून रसायन तंत्रज्ञान संस्थेने हाती घेतलेल्या संशोधनास मदत म्हणून राज्य सरकार दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे केली. मुंबई उपनगर परिसरातील तलाव शुद्धीकरणाची मोहीमही या संस्थेने हाती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. रसायन तंत्रज्ञान संस्थेने सुरू केलेल्या रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त प्रक्रिया तंत्रकार्याच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ तावडे यांच्या हस्ते झाला. या वेळी तावडे यांनी संस्थेच्या संशोधनाची माहिती घेतली. तसेच रंकाळा तलावाजवळील खाणीची त्यांनी पाहणी केली, त्या वेळी ते बोलत होते.

तावडे म्हणाले, संस्थेने शाहूंच्या काळात होते तसे रूप रंकाळा तलावास मिळवून द्यावे. त्यातून  तलाव स्वच्छ होईल, परंतु यापुढे तलावात मिसळणारे सांडपाणी थांबवण्याची जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारावी, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.

रंकाळा तलाव, पंचगंगा नदी शुद्धीकरण करण्यास केंद्र सरकारकडून निधी मिळेल, परंतु निधीपेक्षा इच्छाशक्ती पाहिजे. आम्ही रंकाळा तलाव शुद्धीकरणाची भूमिका याच इच्छाशक्तीच्या जोरावर घेतली आणि त्यास निधीही मिळाला, असे सांगत संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी आमच्या या संशोधनास महानगरपालिकेने सहकार्य करावे, असे आवाहन केले. विजय कुंभार, प्रभाकर तांबट यांनी तलावातील पाण्यावर सुरू असलेल्या संशोधनाबद्दल समाधान व्यक्त केले. अमर जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Government help for rankala lake cleanliness