कोल्हापूर : आपले सार्वजनिक स्थानही न पाहता राज्यात कोणीही कोणावरही उथळ विधाने करत आहेत. हा प्रकार थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन अनुभवी नेते असलेले शरद पवार यांनी याप्रकरणी काहीएक आचारसंहिता तयार करावी, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ते म्हणाले. खासदार नवनीत राणा यांनी ‘मातोश्री’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा केवळ संकल्प केला होता. त्यांनी तशी कृती केली नाही हा भाग तर आणखी वेगळा. राज्यात कोणी कोणावर काहीही आरोप करत आहे. हनुमान चालीसा सारख्या मुद्दय़ावरून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. राजद्रोहाची व्याख्याच बदलण्याची गरज आहे असून यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.

राष्ट्रीय महामार्गावर रस्ते उत्तम असल्याने वेगमर्यादा वाढवावी ही वाहनचालकांची भूमिका योग्य आहे. सध्याच्या गतीने गेले तर वाहन व्यावसायिकांना घरेदारे विकावी लागतील. उपमुख्यमंत्री अजित पवार असो की मी आमच्यावर वेगाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला. पण अशा घटनांची माध्यमांनी अकारण वृत्तांकन लांबवू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आमदार पाटील यांनी एका कार्यक्रमांमध्ये देवेंद्र फडणवीस हे वर्षभरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे विधान केले होते. त्यावर आज पाटील यांनी फडणवीस यांच्याबद्दल आशावाद व्यक्त करणे यात चूक काय आहे, असा प्रतिप्रश्न केला.