सांगली : ग्रामपंचायत अधिकार्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस कायदेशीर उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या सांगली जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात मौजे शिवरे येथे ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि ग्रामपंचायत अधिकार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि ग्रामपंचायत अधिकार्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करण्यात याव्यात या मागणीसाठी आज सांगलीत मूक मोर्चा काढण्यात आला.
शासकीय कर्तव्य बजावताना अधिकार्यांना सुरक्षा मिळावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि ग्रामपंचायत अधिकार्यांच्या संरक्षणासाठी ठोस कायदेशीर तरतुदी कराव्यात, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
सुरक्षेच्या मागणीसाठी दि. १८ ऑगस्टपासून ग्रामसभा कामकाजावर सुरू असलेला बहिष्कारही कायम असल्याचे युनियनच्या पदाधिकार्यांनी सांगितले. या मोर्चाचं नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन शाखा सांगलीचे जिल्हा सरचिटणीस दीपक इंगवले देशमुख, राज्य उपाध्यक्ष आर. डी. पाटील आणि जिल्हाध्यक्ष प्रवीण देसाई यांनी केले.
