बुधवारी मध्यरात्रीपासून ते गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत सलग २४ तास करवीरनगरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ‘जय भीम’चा नारा होत राहिला. प्रतिमापूजन,  मिरवणुका, सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिर, व्याख्याने अशा विविध उपक्रमांनी जयंती जल्लोषी वातावरणात साजरी करण्यात आली.
आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बिंदू चौक येथील आंबेडकर यांच्या पुतळय़ास जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या जयंती सोहळय़ाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, व्यंकाप्पा भोसले, वसंतराव मुळीक यांच्यासह अनेक मान्यवरांनी बिंदू चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्याही पुतळय़ास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी म्हणाले, कोल्हापूर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे नाते असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच राजर्षी शाहूमहाराज यांच्या उपस्थितीत माणगाव येथे झालेल्या माणगाव विकास परिषदेमध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत.
राज्यघटनेच्या संदर्भात समाजाला साक्षर करण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठातर्फे जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या १२५ व्याख्यानांचा समावेश असणाऱ्या गौरवग्रंथाचे प्रकाशन आणि व्याख्यान अशा संयुक्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिका व समाजकल्याण विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जयराज विद्यामंदिर, शिवाजी उद्यमनगर येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या आरोग्य शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, सभागृहनेता प्रवीण केसरकर, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, प्रभाग समिती सभापती राजसिंह शेळके, गटनेते सुनील पाटील, सत्यजित कदम, नगरसेवक अजित ठाणेकर, नगरसेविका ललिता बारमते, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरामध्ये ४४३ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वरोगनिदान, कान, नाक, घसा, अस्थी इ. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. वासन आय केअर यांच्या नेत्ररोगतज्ज्ञांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन नेत्ररुग्णांची मोफत तपासणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Greeting to ambedkar with various activities in kolhapur
First published on: 15-04-2016 at 03:40 IST