कोल्हापूर : आखाती देशात युद्धज्वर वाढीस लागला असल्याने त्याचा परिणाम भारतातून होणाऱ्या व्यापारावर होऊ लागला आहे. आखाती देश हे भारताचे प्रमुख निर्यातदार देश आहेत. तेथील युद्धस्थिती गंभीर होत चालली असल्याने भारतातून निर्यात होणाऱ्या साखरेवर परिणाम झाला आहे. आधीच देशातील साखर साठा वाढत असताना इराणसह आखाती देशातील साखर निर्यात थंडावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बासमती भाताच्या विक्रीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. अमेरिका, इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे आणि इराणने केलेल्या प्रत्युत्तरामुळे आखाती प्रदेशातील भारताच्या प्रमुख निर्यात बाजारपेठांमध्ये साखरेच्या निर्यातीची समीकरणे कोलमडली आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनामुळे आखाती देशातील भारतीय निर्यात व्यापारावर अनिश्चिततेची तलवार लटकत आहे.

भारत सरकार साखर साठा कमी होण्यासाठी दर वर्षी निर्यात कोटा जाहीर करीत असते. हा कोटा दर वर्षी निश्चित आकडेवारीचा नसतो. साखरेचे उत्पादन किती अधिक त्यावर तो अवलंबून असतो. भारत सरकारने यंदाच्या हंगामात २० लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली होती. त्यापैकी ५ लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आखातातील निर्यात

साखरेच्या आयातदारांमध्ये इराण आघाडीचा देश आहे. २०१९ मध्ये अमेरिकेने निर्बंध सैल केल्यानंतर इराणला भारताने दीड लाख टन कच्ची साखर निर्यात केली होती. मार्च २०२५ मध्ये भारताने ४०५ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त किमतीची साखर संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान, इराण, ताजिकीस्तान आदी आखाती देशांना निर्यात केली होती.

आता आखाती देशात युद्धज्वर वाढीस लागला असल्याने तेथे होणारी साखर निर्यात ढेपाळण्याच्या स्थितीत आहे. मुळात भारतीय बाजारापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचा दर कमी असल्याने ती निर्यात करण्यास कारखानदार अनुत्सुक आहेत. अशातच युद्धाचा भडका उडाला असल्याने जहाजमार्गे वाहतूक होणे कठीण बनले आहे.

विमान वाहतुकीवर निर्बंध आलेले आहेत. अशा परिस्थितीत इराणसह आखाती देशांना साखर वाहतूक निर्यात होण्याची शक्यता कमी आहे. त्या देशांमध्ये रमजानसाठी साखरेची मागणी चांगली असते. आता ही मोठ्या सणाची बाजारपेठ गमावण्याची वेळ साखर उद्योगावर आली आहे

  • पी. आर. पाटील
    अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ

भारतातील शिल्लक साखरेचा वाढता कोटा लक्षात घेऊन साखर निर्यातीची भूमिका घेण्यात आली आहे. आखाती देशातील युद्धामुळे साखर निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी देशातील साखर साठ्यात भर पडून त्याचे वेगळेच परिणाम होणार आहेत. यामुळे युद्धज्वर लवकर संपुष्टात येऊन आखाती देशातील साखर निर्यातद्वार लवकर उघडणे हितकारक असल्याने त्याची प्रतीक्षा गरजेची आहे.

  • विजय औताडे, साखर उद्योग अभ्यासक

शिरखुर्म्याची चिंता

भारताने सन २०२४ मध्ये १.२५ अब्ज डॉलर किमतीची बासमती तांदूळ, अन्न, पशुखाद्य, कॉफी, चहा, खाद्य, फळे, यंत्रसामग्रीचे भाग, औषधे आदी उत्पादने इराणला निर्यात केली होती. त्यात बासमती भाताचे प्रमाण (६० हजार टन) सर्वाधिक होते. आता साखर आणि बासमती भात या दोन्हींची निर्यात धोक्यात आल्याने इराणसह आखाती देशात रमजानमध्ये शिरखुर्मा बनवण्याची वेगळीच अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.