सांगली : सांगलीत पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जलक्रीडा स्पर्धेत अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाने १९ पदके पटकावत विजेतेपद पटकावले. तर मोहालीच्या चंदीगड विद्यापीठाने उपविजेतेपद तर चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाने तृतिय स्थान मिळवले. रॉयल कृष्णा बोट यलब येथे गेले चार दिवस सुरू असलेल्या जलक्रीडा स्पर्धांचा बुधवारी सांगता समारंभ झाला. एकूण जल क्रीडा स्पर्धेत पंजाबमधील खेळाडूंनी वर्चस्व सिद्ध केले.
शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठे महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविद्यापीठ कॅनॉईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या.चंदीगड विद्यापीठाने १८ तर पंजाब विद्यापीठाने १५ पदके पटकावली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला.
गेले चार दिवस विविध गटांत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी आज अखेरच्या दिवशी २०० मीटर शर्यतीत आपला खेळ उंचावत दोन पदके प्राप्त केली.
अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाने स्पर्धेच्या सुरवातीपासून सर्वच गटांत आपले वर्चस्व कायम राखले. स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण कामगिरीच्या जोरावर एकूण ११ सुवर्ण, ८ रौप्य अशी एकूण १९ पदकांची कमाई करत त्यांनी अजिंक्यपद पटकावले. मोहालीच्या चंदीगड विद्यापीठाने ६ सुवर्ण, ६ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण १८ पदके प्राप्त करीत उपविजेतेपद मिळविले. चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाने ७ सुवर्ण, २ रौप्य व ६ कांस्य अशा एकूण १५ पदकांसह तृतीय स्थान पटकावले.
स्पर्धेत लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने २ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्य अशी ८ पदके प्राप्त करीत चौथे, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १ सुवर्ण ४ रौप्य व १ कांस्य अशी ६ पदके मिळवित पाचवे स्थान प्राप्त केले. गुरू काशी विद्यापीठ, केरळ विद्यापीठ यांनी प्रत्येकी ४, पुण्याचे भारती अभिमत विद्यापीठ, मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, राजस्थान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी प्रत्येकी ३ पदके प्राप्त केली. पारितोषिक वितरण सोहळयास स्पर्धा निरीक्षक डॉ. संदीप शिंदे, सांगलीचे माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पुण्याच्या युवक सेना संचालनालयाचे उपसंचालक सुहास पाटील, सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर आदी उपस्थित होते.
