हैद्राबाद येथून मिरचीच्या पोत्याखाली लपवून आणलेला सागर कंपनीच्या गुटख्याचा साठा गुरुवारी येथील पोलिसांनी जप्त केला. ट्रक, गुटखा असा सुमारे १९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सायंकाळी पत्रकारांना दिली.
हैद्राबाद येथून अशोक लेलॅण्ड (टीएस १२ यूए १०३६) हा रत्नागिरीकडे चालला होता. ट्रकमध्ये मिरचीची पोती भरण्यात आली होती. त्याखाली गुटख्याची पोती लपविण्यात आली होती. गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कळली होती. त्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावण्यात आला होता.
सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सदरचा ट्रक राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा येथे आला. तो ट्रक अडवून पोलिसांनी पाहणी केली असता त्यामध्ये सागर २००० या कंपनीच्या गुटख्याची ४० पोती आढळून आली. त्याची किंमत सुमारे ९ लाख रुपये आहे. ट्रकचालक महंमदखुर्रमशेख ख्वाजाअली (वय २३, रा. हैद्राबाद) यास ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रक व गुटख्यासह १८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या पथकाने केली असून शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.