आगामी जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कागल तालुक्यातील आमदार हसन मुश्रीफ यांचे तीन प्रबळ विरोधक एकत्र येण्याचे संकेत मिळाले. भाजपात प्रवेश केलेले युवा नेते, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे तसेच शिवसेनेतील जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे यांनी याच मुद्दय़ाला धरून वक्तव्ये केली. तिघांनीही एकमेकांवर स्तुतिसुमने उधळण्यात हयगय केली नाही .

करडय़ाळ (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले. त्या प्रसंगी तिन्ही नेते उपस्थित होते. कागल नगरपालिका निवडणुकीत झालेल्या चुका गंगेला अर्पण करू या. एकमेकांचा आदर करून कुरघोडीला थारा न देता विश्वासार्हतेला जपून आपण एक आचारसंहिता तयार करू या. याद्वारे कागल तालुक्याच्या स्वास्थ्य, कल्याणासाठी आपण सर्वानी एकत्र येऊ या, अशी साद शिवसेनेचे संजय घाटगे यांनी संजय मंडलिक व समरजितसिंह घाटगे यांना घातली.

मंडलिक म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि शाश्वत विकास या मुद्दय़ावर आपण खांद्याला खांदा लावून काम करू. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने लोकमानस चाचपणी झाली आहे. आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीत कागल तालुका स्वच्छ व सुंदर होण्यासाठी आपल्या तिन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावं की काय, असा विचार असून विधायक कामासाठी एकत्र येण्यास काहीच हरकत नाही.

आपण एका वेगळ्या व्यवस्थापनामध्ये वाढलो असल्यामुळे जे काम हातात घेईन ते काम पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही, असा आशावाद व्यक्त करत समरजितसिंह घाटगे म्हणाले, आपण सकारात्मक विचार घेऊन राजकारण करीत आहोत. याच राजकारणाची आज गरज आहे. सत्तेतून आपण मोठं न होता कागल तालुका मोठा झाला पाहिजे,  अशा पद्धतीचे काम आपण करणार आहे.

शाहूचे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, उपसभापती भूषण पाटील, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, नामदेवराव मेंडके, विश्वास कुराडे, शहाजी यादव, रामचंद्र सांगले, युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.