कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक गोकुळ मध्ये भाजप हाच थोरला भाऊ असे म्हणत असले तरी ते राज्यामध्ये मोठा भाऊ आहेत. परंतु गोकुळ दूध संघामध्ये मोठा भाऊ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे, असे विधान करीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या थोरल्या भावावरून महाडिक यांना डिवचले. शुक्रवारी येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अपात्र ठरण्याच्या धोक्याच्या काठावरून परतलेल्या १४०० संस्थांच्या चालकांचा सत्यविजय मेळावा पार पडला. त्यामध्ये अदृश्य शक्ती वरून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले होते. त्यांना महायुतीच्या आघाडीत घेऊ नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. या घटनेकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले, मी आताच मुंबईहून आलो आहे. याबाबत मला काही माहित नाही. पण चर्चेतून मार्ग निघेल, अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.
गोकुळ दूध संघाची निवडणूक आम्ही ‘महायुती’ म्हणूनच लढणार आहोत, असा पुनरुच्चार करतानाच मुश्रीफ म्हणाले, सध्या जे काही चित्र दिसत आहे. त्यामधील सगळे सदस्य महायुतीचेच असताना असे काही वादग्रस्त का होत आल आहे, हे आजही मला अनाकलनीयच आहे. आजही मला तरी याचे उत्तर सापडलेले नाही. यातून सामंजस्याने मार्ग काढू.
महायुतीमध्ये पालकत्वाची भूमिका हसन मुश्रीफ यांनी एकट्यानेच घेतलेली आहे, बाकीच्यांनी ती सोडून दिलेली आहे, असे समजायचे का, या प्रश्नावर ते म्हणाले, हसन मुश्रीफ बोलत आहेत, तर पुन्हा आपण कशाला बोला अशी इतरांची भूमिका असावी.
गोकुळ दूध संघाच्या जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार या प्रश्नावर मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही सर्व सांगितलेले आहे. तिढा व्यवस्थित सुटेल, तेच यातून मार्ग काढतील, असा विश्वास व्यक्त केला. एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीबाबत विचारले असता ते म्हणाले, हे प्रकरण महायुती सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिशय गांभीर्याने घेतलेले आहे. त्याबद्दल मुलांच्या प्रतिक्रिया अत्यंत तीव्र आहेत.
‘आम्ही कष्ट करतो, मरमर मरतो आणि अशा पद्धतीने अन्याय होतो’ अशी त्यांची भावना आहे. त्यांच्या मनातील ही भावना काढून टाकण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांना शिक्षा करण्यासाठी मुख्यमंत्री पाऊल उचलतील.
या प्रकरणी नेमलेल्या एसआयटीच्या चौकशी समितीला आमदार रोहित पवार ‘टाईमपास’ म्हणत असल्याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले, अशा प्रकरणात चौकशी समिती नेमल्याशिवाय काहीही निष्कर्ष काढता येणार नाही. सरकारने कोणतीही कृती केली की त्यावर टीका करणे हे विरोधकांचे काम आहे, ते काम ते प्रामाणिकपणे करीत आहेत.
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, तर दुसरीकडे शेतकरी संघटनेचा ऊस दरावरून याला विरोध आहे. याबाबत भूमिका विचारल्यावर मुश्रीफ म्हणाले, गेल्या वर्षी प्रतिटनाला ३४०० रुपये दिले होते. १०० रुपये द्यायचे राहिले होते. अनेक कारखाने ते देत आहेत. साखरेचा वाढलेला दर हा कृत्रिम होता. दोनच दिवसांसाठी तो वाढला आणि आता परत खाली आलेला आहे. साखरेच्या दरावर ते ऊस दर मागत असतील, तर त्यांच्याशी बसून चर्चा करावी लागेल. त्यांना समजावून सांगावे लागेल की कारखान्यांना त्याचा फारसा फायदा झालेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे कारखाने योग्य ती एफआरपी देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीमधील थकबाकी राहिलेली नाही.
१५ ऑक्टोबरला साखर हंगाम सुरू होणार आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, महाराष्ट्रात सणासुदीच्या तोंडावरच फार मोठी साखर टंचाई निर्माण झालेली आहे. प्रति किलोला ६० रुपये, ७० रुपये रुपयांवर साखर दर पोहोचल्यानंतर सरकारला हे पाऊल उचलावे लागलेले आहे. आता शेतकरी संघटनेशी चर्चा करावी लागेल. याबाबतची शासनाची भूमिका त्यांना सांगितल्यानंतर त्यावर निर्णय होईल.
पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन प्रकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, हे न्यायालयीन प्रकरण आहे, यावर बोलणे उचित ठरणार नाही.माधुरी हत्तीण परत येत असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, माधुरी हत्तीणीचे आपण सर्वजण मिळून स्वागत करूया. ज्याप्रमाणे तिचे वनतारामध्ये पालन पोषण झाले त्याच पद्धतीने पालनपोषण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.
