कोल्हापूर : मध्यंतरी राजकीय झाकोळ निर्माण झालेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे राजकीय ग्रह सध्या भलतेच बलवत्तर असल्याचे दिसत आहे. त्यांच्याच नव्हे तर सहकाऱ्यांच्या नशीबी राजयोग लिहिला जात आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या रंगलेल्या सत्तास्पर्धेत बाजी मारत मुश्रीफ यांनी कागलला आणखी एक मानाचे पद मंगळवारी नेले. कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, शेतकरी संघ ही मानांकित पदे आधीच जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या कागलला नेण्यात मुश्रीफ यांना यश आले आहे.

राजकारणातील चढ-उतार हे ठरलेले असतात. राजकीय आलेख उंचावत चालला असताना वक्रीचा ग्रह मागे लागला की वाटचालीला ग्रहण लागते. मध्यंतरी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासोबतच कागलचे समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडीचा चौकशीचे लचांड लावले होते. त्यामध्ये स्वतः हसन मुश्रीफ, त्यांचे कुटुंबीय, जिल्हा बँक, जावई नातेवाईक यांनाही अतोनात त्रास सहन करावा लागला. मुश्रीफ यांनी ईडीच्या चौकशीतून आपण निर्दोष सुटल्याचा निर्वाळा अलीकडेच स्वतःहून दिला आहे. कोल्हापुरात नुकतेच आलेले किरीट सोमय्या यांनी या मुद्द्यावर भाष्य करण्याचे टाळले. सोमय्या यांच्या लेखी हे प्रकरण आता गाशात गुंडाळ्यात जमा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तो त्यांना फलदायी ठरला. एक तर चौकशीचा ससेमिरा गायब झाला. शिवाय राजकीय प्रतिष्ठा असणारे कॅबिनेट मंत्री पद मिळाले. राष्ट्रवादीत सुनेत्रा पर्व सुरू झाल्यानंतरही मुश्रीफ यांची सर्व पदे शाबूत राहिली आहेत.

सत्तेचा किरीट कागलला

इतकेच नाही तर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातही हसन मुश्रीफ यांचा वर्चस्व दिसू लागले आहे. त्यातही कागल विधानसभा मतदारसंघात सर्वच पत्ते त्यांच्या बाजूने पडू लागल्याने मुश्रीफ हे खऱ्या अर्थाने वजनदार नेते बनले आहेत. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे समरजित घाटगे यांनी वैरभाव विसरून मुश्रीफ यांना आलिंगन दिले आहे. दोघांनी एकत्रित नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका लढवून यशाचा झेंडा रोवला आहे.

राजकीय प्रभावाचा फायदा उठवत मुश्रीफ यांनी आपल्या कागल मतदारसंघात सत्तेचा किरीट नेला आहे ते स्वतः जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गेली दहा वर्ष अध्यक्ष आहेत. राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ दूध संघावर त्यांचे सुपुत्र नवीद यांची अत्यंत नाट्यपूर्णरित्या अध्यक्षपदी निवड केली गेली. कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये याच तालुक्यातील सर्जेराव पाटील यांची सभापती पदी वर्णी लागली ती मुश्रीफ यांच्यामुळे. जिल्हा परिषदेच्या महायुती अंतर्गत टोकदार सत्तास्पर्धेत शोभा खोत यांच्याकडे आज अध्यक्षपदाचे मानाचे पान मिळून कागलचा सत्तापटलावरील प्रभाव वाढीस लागला आहे. एकाच तालुक्याला इतकी महत्त्वाची पदे जाण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ. आता आगामी पुणे पदवीधर मतदारसंघात मुश्रीफ यांचे अत्यंत निकटचे सहकारी, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. असे झाले तर मुश्रीफ यांची कागल बरोबर जिल्ह्याच्या राजकारणातील वट आणखी वाढीस लागेल यात शंका दिसत नाही.

हे कसले भाबडेपण ?

हसन मुश्रीफ हे अनेकदा भाषणामध्ये स्वतःचा उल्लेख भाबडा माणूस असा करतात. आपण भाबडेपणाने कसे वागतो याचा दाखला देत असतात. परंतु असे म्हणणाऱ्या मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील वरील तमाम महत्त्वाची पदे एका कागल तालुक्याला नेऊन आपण वरकरणी भाबडे असलो तरी व आतून किती चाणाक्ष आहे हेच दाखवून दिले आहे.