दयानंद लिपारे

कोल्हापूर : विविध प्रकारच्या चौकशी यंत्रणा कार्यरत झाल्या असताना त्याला सामोरे जाण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ आणि समर्थकांनी पुन्हा एकदा चालवलेली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मुश्रीफ यांनी आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी शेकडो समर्थकांनी मुंबई गाठली आहे, तर रामनवमीदिनी वाढदिवसानिमित्त ग्रामदैवतांना अभिषेक घालून कार्यकर्ते, नागरिक संघटित केले जात आहेत. दुसरीकडे मुश्रीफ यांचे राजकीय विरोधक भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थकांनी तक्रारीचा ओघ सुरू ठेवला असल्याने उभयतांमधील संघर्ष पुढच्या टप्प्यावर जात आहे.

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

 आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळय़ाचे आरोप भाजपकडून करण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबतचे अनेक मुद्दे लावून धरले आहे. त्यावर प्राप्तिकर विभाग अंमलबजावणी संचालनालय आणि पोलिसांचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून चौकशी सुरू आहे. चौकशीचा ससेमिरा सुरू असताना त्याला भिडण्याची भूमिका मुश्रीफ यांनी घेतली असल्याचे दिसते. फेब्रुवारी महिन्यात शिवजयंती व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त मुश्रीफ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. अजित पवार यांनीही ‘तपास यंत्रणांचा गैरवापर सत्ताधारांकडून केला जात आहे. अशा स्थितीत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीय हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी असल्याने एकटे पडू देणार नाही,’ असे आश्वासक भाष्य करून धीर दिला होता.

 मुश्रीफ-घाटगे यांचातील स्थानिक संघर्ष पुढील टप्प्यावर जाताना दिसत आहे. ‘सरसेनापती घोरपडे साखर कारखान्याचे सभासद होण्यासाठी भागभांडवलकरिता दहा हजार रुपये घेतले; पण सभासद केले नाही. कारखान्याची मालकी मात्र मुश्रीफ कुटुंबीयांची दिसते. या व्यवहारात त्यांनी आर्थिक फसवणूक केली आहे,’ अशी तक्रार घाटगे समर्थकांनी कोल्हापुरातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे केली आहे. यापूर्वी त्यांचे समर्थक विवेक कुलकर्णी यांनी मुश्रीफ यांच्याविरोधात अशीच तक्रार मुरगुड पोलिसात केली होती. घाटगे यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेसह संताजी घोरपडे कारखान्याविषयी एकापाठोपाठ तक्रारी सुरू आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी मुश्रीफ समर्थकांची आहे. घोरपडे साखर कारखान्यात मध्ये मुश्रीफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेल्या विवेक कुलकर्णीसह १६ जणांच्या तक्रारीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीचा खुलासा करण्यासाठी शेकडो सभासद शेतकऱ्यांनी काल मुंबईतील ईडी कार्यालयावर धडक मारली. यापूर्वी कुलकर्णीविरोधात खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी मुश्रीफ समर्थकांनी कुलकर्णीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे कागलमधील संघर्षांचे वारे आता राजधानी मुंबईपर्यंत धडकले आहे.

पुन्हा शक्तिप्रदर्शनाची तयारी

 रामनवमी दिवशी मुश्रीफ यांचा तिथीनुसार वाढदिवस साजरा केला जातो. कागल मतदारसंघात भाजपकडून हिंदूत्वाचा मुद्दा पुढे आणला जात आहे. यामुळे शिवजयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून भगवे वादळ आणणारा उपक्रम कागलमध्ये जोरदारपणे राबवला होता. आता रामनवमी दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामदैवतांना अभिषेक, महाआरती करण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमाद्वारे हिंदूत्वाच्या मुद्दय़ाशी आपणही तितकेच निगडित असल्याचे दाखवून दिले जात आहे. लोकोस्तव वाढदिवस असे स्वरूप देताना त्याला अशी धार्मिक किनार जोडली आहे. मतदारसंघातून अनेक मंदिरांची उभारणी करणाऱ्या मुश्रीफ यांची ‘मंदिरवाले बाबा’ अशी प्रतिमा पुढच्या टप्प्यावर घेण्याचा हा आणखी एक प्रयत्न समर्थकांनी चालवला आहे.