कोल्हापूर : हातकणंगले येथील कथित “लव्ह जिहाद” प्रकरणाच्या तपासाबाबत सकल हिंदू समाजाच्यावतीने येथे सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद घेत पोलीस तपासावर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
धवलसिंह मोहिते पाटील, दीपक काटे, संताजी घोरपडे, व्यंकटेश मोरे यांनी सांगितले की, या लव्ह जिहाद प्रकरणाच्या तपासात डिजिटल पुराव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. महिला पंचांची अनुपस्थिती आणि ओळख परेड न घेणे यासह तपासात तब्बल १०१ त्रुटी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरोपींच्या जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व्हॉट्सअप चॅटमध्ये अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण करणारे संदेश आहेत.
अदृश्य शक्तीचा हात
हे प्रकरण दाबण्यासाठी किंवा आरोपींना वाचवण्यासाठीमागे कोणतीतरी अदृश्य शक्ती काम करत असल्याचा गंभीर आरोप गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे यांनी केला. तसेच, पोलीस तपासामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून आरोपींना सहकार्य करण्यासाठी काही त्रुटी (लूपहोल्स) सोडले जात आहेत का, असा संशय व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांकडे धाव
या संपूर्ण प्रकरणाची माहिती आणि तपास यंत्रणेचा हलगर्जीपणा मुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिला जाणार असून, दोषी अधिकाऱ्यांवर व आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अत्यंत भयंकर आणि संवेदनशील गुन्ह्याबाबत सकल मराठा समाज आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आली. हा केवळ एका मुलीवर झालेला वैयक्तिक अत्याचार नसून, मराठा समाजाच्या लेकी-सुनांना टार्गेट करून, त्यांच्यावर अत्याचार करून मराठा समाजाची अस्मिता पायदळी तुडवण्याचा आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हा पूर्वमनियोजित कट असल्याचे या चॅटिंगवरून स्पष्ट होते. आरोपींची ही जातीय आणि गुन्हेगारी मानसिकता दोषारोपपत्रात स्पष्ट दिसत असतानाही पोलिसांनी ‘हेट क्राईम’ आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचे कडक कायदेशीर कलम लावण्याऐवजी, उलटपक्षी धार्मिक भावना दुखावल्याचे कलम वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला! पोलिसांची ही भूमिका आरोपींना पाठीशी घालणारी आणि संशयास्पद आहे, असा आरोप करण्यात आला.
मुख्य मागण्या याप्रमाणे
मराठा समाजाला टार्गेट करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व आरोपींवर तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करावी. पूरभारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १७३(८) नुसार या सर्व डिजिटल व सामाजिक पुराव्यांसह तात्काळ ‘पूरक दोषारोपपत्र’ दाखल करण्यात यावे. खटला विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.तपासात पळवाटा ठेवून आरोपींना जामीन मिळण्यास मदत करणाऱ्या संबंधित तपास अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून खातेनिहाय चौकशी व्हावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या अस्मितेशी आणि लेकी-सुनांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास, सकल मराठा समाज आणि सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र एल्गार करेल, ज्याची संपूर्ण जबाबदारी शासन व पोलीस प्रशासनाची राहील, असा इशारासकल मराठा समाज व सकल हिंदू समाज प्रतिनिधी यांच्या वतीने देण्यात आला.
