सांगली : दिवसभराच्या तीव्र उकाड्यानंतर गुरुवारी सायंकाळी ईश्वरपूर, पलूस, खानापूर तालुक्यात दमदार अवकाळी पावसानेहजेरी लावली. विट्याजवळ मायणी रस्त्यावरील गार्डी परिसरात गारपीटही झाली. वाळवा तालुक्यात काही भागात सुर्योदयावेळीही पावसाने हजेरी लावली. गारपीटीमुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असून जोरदार वारे व पावसाने आंब्याचा बागेत सडा पडला होता.
आज सकाळी साडेसहा वाजता ईश्वरपूर, कुरळप परिसरात हलका पाउस झाला. या रिमझिम पावसातच काही ठिकाणी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यानंतर दिवसभर कडक उन पडले होते. उकाडाही असह्य असताना सायंकाळी पलूस, ईश्वरपूर, आष्टा, भिलवडी, औदुंबरसह कडेगाव, विटा, गार्डी परिसरात सुमारे एक तास पावसाने हजेरी लावली. जोरदार वार्यामुळे काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्या.
गार्डी परिसरात गारपीटही झाली. या गारपिटीमुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले असून पाने तर फाटली आहेतच पण याचबरोबर कोवळे आंबे तुटून खाली पडले. ईश्वरपूर परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
या अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या गहू व हरभरा पिकांच्या काढणीवर परिणाम झाला असून काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हनुमान जयंती निमित्त विविध ठिकाणी महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दुपारच्या पावसामुळे या कार्यक्रमांमध्ये अडथळा निर्माण झाला. अनेक ठिकाणी महाप्रसाद वाटप उशिरा पार पडले, तर काही ठिकाणी कार्यक्रमांवर मर्यादा आणावी लागली.
दरम्यान, सांगली मिरज शहरात दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होती. पाउस कधीही पडेल अशी स्थिती सायंकाळी उशिरापर्यंत होती. जिल्ह्याच्या पश्चिम व उत्तर भागात पाउस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काहींसा दिलासा मिळाला. अद्याप दोन दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून जिल्ह्याच्या पूर्व भागात अद्याप द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अवकाळी पावसाने द्राक्षाला धोका पोहचण्याचा संभव असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर द्राक्ष काढणी झालेल्या बागांची एप्रिल छाटणीची कामे सुरू असताना गारपीट झाली तर वलांड्यावरील डोळे नष्ट होण्याचा धोका आहे.
