महापुरामुळे ऊस शेतीला फटका; एक लाख हेक्टर उसाचे नुकसान

पश्चिम महाराष्ट्र सिंचनाचे नियोजन गावपातळीपर्यंत पोहोचलेले आहे. कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा नदी खोऱ्यामध्ये ऊस शेती बहरलेली आहे.

sugarcane
(प्रातिनिधीक फोटो)

|| दयानंद लिपारे
कोल्हापूर : जुलैतील महापुराने पश्चिम महाराष्ट्रातील अर्थकारणाचा कणा असलेल्या ऊस शेतीची अतोनात हानी झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे एक लाख हेक्टर उसाचे नुकसान झाले आहे. महापुरामुळे सातत्याने ऊस शेतीला जबर फटका बसत असल्याने त्याची मुळातून कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न संशोधक, शास्त्रज्ञांनी सुरू केला आहे. या दृष्टीने शास्त्रज्ञांचे एक पथक पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा करीत आहे. त्यांना प्राथमिक निरीक्षणामधून काही बाबी निदर्शनास आल्या असून अंतिम अहवाल लवकरच बनवला जाणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र सिंचनाचे नियोजन गावपातळीपर्यंत पोहोचलेले आहे. कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा नदी खोऱ्यामध्ये ऊस शेती बहरलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने एफआरपीप्रमाणे दर देत असल्याने शेतकऱ्यांचा कलही शाश्वात दराची हमी असलेल्या उसाकडे राहिला आहे. ऊस शेतीमध्ये अलीकडे महापुराची नवीन समस्या डोके वर काढत आहे.  २००५ आणि २०१९ साली महापुराने शेतीची अतोनात हानी झाली होती. त्यात या भागातील प्रमुख पीक ऊस कुजून गेले होते. हा कटू अनुभव ताजा असतानाही पुन्हा जुलैच्या अखेरीस झालेल्या महापुराने ऊस पिकाची दाणादाण उडाली आहे. एका कोल्हापूर जिल्ह्यात ५० हजार हेक्टर उसाची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

उसाला असा सातत्याने फटका बसत असेल तर शेतकरी या पिकापासून दूर जाण्याची भीतीही आहे. त्यामुळे ऊस शेतीच्या बाबतीत कोणते नियोजन असले पाहिजे याचा आढावा घेण्यासाठी शास्त्रज्ञांचे एक पथक महाराष्ट्राचा दौरा करीत आहे. पुणे येथे १९३५ साली स्थापन झालेल्या डेक्कन शुगर इन्स्टिटूस ऑफ असोसिएशनच्या शास्त्रज्ञांचे पथक कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील महापूरग्रस्त भागाचा दौरा करीत आहे. डॉ. मच्छिंद्र बोखारे, डॉ. बी. आय. पाटील, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, नेताजी पवार,आसाराम कापरे आदी शास्त्रज्ञांनी चिखलाने माखलेल्या बांधावर धाव घेऊन ऊस पिकाची पाहणी केली आहे. लागण, खोडवा उसावर महापुराच्या पाण्याचा नेमका काय परिणाम झाला आहे, पाणी पातळी किती होती, ती किती काळ शेतामध्ये टिकून राहिली,पीक वाढीवर नेमका कोणता परिणाम संभवत आहे.

इतकेच नव्हे तर बुडीत उस गाळपाला गेल्यानंतर त्याचा उताऱ्यावर तसेच इथेनॉलची निर्मिती करत असताना कोणते परिणाम होणार याचाही या निमित्ताने कानोसा घेतला जाणार आहे. एकूणच ऊस लागण पासून ते साखर निर्मिती पर्यंतच्या प्रक्रियेत महापुरामुळे कोणता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे, याचा समग्र अभ्यास केला असून त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.

उसाचे नवे वाण टिकाऊ

प्राथमिक निष्कर्षानुसार ४१९, ७४०, २६५ या जुन्या जाती महापुरा मध्ये टिकत नसल्याचे दिसून आले आहे. ८६०३२ वाण बऱ्यापैकी टिकले आहे. २०१९ च्या महापुरा मध्ये काही वाण पुरात बुडूनही त्यांची उगवण क्षमता चांगली राहिली होती अशा नोंदी दिसतात. कोईमतुर, कोल्हापूर गूळ संशोधन केंद्र येथील काही जाती टिकून राहिल्या आहेत. शास्त्रज्ञांनी प्रत्येक वाणाची कसून पाहणी केली आहे.त्याचा अहवाल साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असे या पथकातील वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Heavy rain fall flood hit sugarcane farming loss one lakh hectares of sugarcane akp

ताज्या बातम्या