सांगली : ऐन हंगामात थंडी गायब होउन दोन दिवस झाल्यानंतर संक्रांती दिवशी म्हणजे बुधवारी जत शहर व परिसरात अर्धा तास मुसळधार पावसाने थैमान घातले. या अवकाळी पावसाने फुलोर्‍यात आलेल्या शाळू पिकासोबतच रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान  होणार असून द्राक्ष बागायतदारांची झोप उडविणारा हा पाउस आहे.

गेल्या दोन दिवसापासून थंडी गायब झाली असून हवेतील गारवाही कमी झाला आहे. बुधवारी हवेतील किमान तपमान १९ तर कमाल तपमान ३१ अंश सेल्सियस होते. सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने पावसाची शक्यता होतीच. आज दुपारी जत शहर  परिसरात  सुमारे अर्धा तास मुसळधार  पाउस पडला. या पावसाने शहरात रस्त्यावर पाणी वाहत होते. तर रब्बी हंगामातील पिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

रब्बी हंगामातील शाळू पिक सध्या फुलोर्‍यात आहे. तर काही ठिकाणी दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. फुलोर्‍यात असलेल्या  कणसावर  पावसाचे थेंब पडल्यानंतर शाळूची फुले कुजल्यानंतर केवळ मोकळी कणसेच उरणार आहेत. कारण शाळूच्या कणसात एकच फुलकळी असते. त्यात पाणी शिरले की ती खराब होते. तर हरभरा पिकावर ढगाळ हवामानामुळे घाटेअळीचा शिरकाव बळावणार आहे.तर गहू पोटरी पडण्याच्या स्थितीत  आहे, तर काही क्षेत्रावरील गहू तयार होत आहे. पाउस पडल्याने पाणगहू होणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

द्राक्ष पिक अंतिम टप्प्यात असून मणी पक्वतेच्या मार्गावर आहेत तर काही ठिकाणच्या बागामध्ये माल काढणीही सुरू झाली आहे. मणी तयार होण्याच्या स्थितीत  असलेल्या बागामध्ये दावण्या तर तयार माल असलेल्या बागामध्ये भुरीचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डाळिंबांचे तर यावर्षी अतिपावसाने गणितच बिघडले असून उत्पादन अल्प आहे. आजच्या पावसाने तयार माल डागाळण्याची चिंता आहे.