अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी पदाधिकाऱ्यांना ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमाचे आयोजन चांगलेच भोवले आहे. प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, विजय कोंडके या माजी अध्यक्षांसह अलका कुबल, प्रिया बेर्डे, व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर यांच्यासह तत्कालीन संचालकांना १० लाख ७८ हजार रुपये जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. चित्रपट महामंडळाच्या इतिहासात संचालकांवर अशी सर्वात मोठी कारवाई प्रथमच झाली आहे.

हेही वाचा >>>कोल्हापुरात भाजप महिला आघाडीची पदाधिकारी विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार

चित्रपट महामंडळातील गटातटांचे वाद सातत्याने गाजत आहेत. मागील संचालक मंडळांनी पुणे येथे ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी ५ लाख २० रुपये खर्च केले होते. या खर्चावरून महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जोरदार गोंधळ उडाला होता.
त्यानंतर कोल्हापूर येथील काही सभासदांनी धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर धर्मादाय आयुक्त यांनी ही रक्कम भरण्याचा आदेश दिला होता. तथापि टंकलेखनाची चूक झाल्याचे कारण पुढे करून तत्कालीन संचालकांनी रक्कम भरली नव्हती. या प्रकरणाचा पाठपुरावा महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सुरू केला. त्यावर धर्मादायुक्तांनी टंकलेखनाची चूक सुधारून नव्याने आदेश काढून उपरोक्त रक्कम भरण्याचा आदेश दिला. परंतु याचवेळी या संचालकांनी उच्च न्यायालयात नाव घेतली होती. त्यावर त्यांना प्रथम १० लाख ७८ हजार ही रक्कम न्यायालयात जमा करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.