हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा–जलालदाभा परिसराला बुधवारी (ता. १) मध्यरात्री १.२० वाजता ३.६ रिश्चर तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू फुलदाभा परिसरात असून त्याची खोली पाच किलोमीटर नोंदविण्यात आली. सलग होत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे औंढा नागनाथ व वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भूकंपापूर्वी भूगर्भातून मोठा गडगडाटाचा आवाज ऐकू आला. त्यानंतर घरांची तावदाने, पत्र्यांची छपरे व इतर वस्तू हलू लागल्याने नागरिकांनी तातडीने घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. या अचानक झालेल्या प्रकारामुळे अनेक गावांतील ग्रामस्थांनी भीतीच्या छायेखाली रात्र जागून काढली.

या भूकंपाचे धक्के औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा, जलालदाभा, पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, निशाणा, असोंदा, काकडदाभा, पांगरा, मेथा, जडगाव, राजापूर, जांब तसेच वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, कुपटी, वापटी, कुरुंदा, गिरगाव आदी गावांमध्ये जाणवले. मागील काही दिवसांपासून वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरातही वारंवार भूकंपाचे धक्के व भूगर्भातील गडगडाटामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली, तरी वारंवार होत असलेल्या धक्क्यांमुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. प्रत्येक घटनेनंतर प्रशासनाकडून पाहणी व जनजागृती केली जात असली, तरी या भूकंपामागील भूगर्भीय कारणांचा सखोल वैज्ञानिक अभ्यास करावा अशी मागणी केली जात आहे.