कोल्हापूर : प्रचलित इतिहासाच्या चौकटीच्या बाहेर पडत इतिहासाला नवी दिशा आणि गती देणारे इतिहास संशोधक, लेखक, व्याख्याते आणि विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार हे काल काळाच्या पडद्याआड झाले. मराठ्यांच्या इतिहासातील अनेक अज्ञात व दुर्लक्षित व्यक्तींवर तसेच घटनांवर पुनर्चिकित्सेचा झोत टाकत त्यांना प्रकाशात आणण्याचे काम डॉ. पवार यांनी आयुष्यभर केले.
सांगली जिल्ह्यात एका सामान्य कुटुंबात जन्मलेले जयसिंगराव पवार हे कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंंगमध्ये केवळ एक ट्रंक व वळकटी घेऊन दाखल झाले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामधून इतिहास विषयातून बी.ए. व नंतर एम.ए. झाले. कोल्हापूरच्याच शिवाजी विद्यापीठात त्यांनी पीएच. डी. संपादित केली. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी इतिहास संशोधक म्हणून त्यांची जडणघडण सुरू झाली. ऐतिहासिक कागदपत्रांचे संशोधन व संपादन याचे प्राथमिक धडे डॉ. अप्पासाहेब पवार यांच्याकडून त्यांना मिळाले. पुढे आयुष्यभर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राचा इतिहास आणि विशेषतः शिव-शाहू विचारांच्या संशोधनासाठी समर्पित केले. १९६९ ते २००१ या काळात डॉ. पवार यांनी महाविद्यालयीन क्षेत्रात इतिहास अध्यापनाचे कार्य केले. या तीन दशकांहून अधिक काळात इतिहास विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची २० पुस्तके त्यांनी लिहिली. ती सर्व महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून अत्यंत सोप्या शैलीत इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी या पुस्तकांमध्ये केली असल्यामुळे ती क्रमिक पुस्तके न राहता, इतिहासप्रेमींची संदर्भ पुस्तके झाली.
त्यांनी लिहिलेल्या ‘राजर्षी शाहू छत्रपती’, ‘क्रांतिसिंह नाना पाटील’, ‘छत्रपती संभाजी महाराज’, ‘मराठी सत्तेचा उदय’ यांसारख्या अनेक ग्रंथांनी इतिहास संशोधनाला नवी दिशा दिली आहे. कर्तृत्व संपन्न शिवरायांच्या पुढच्या पिढीचे महाराष्ट्राला असलेले योगदान मांडण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. छत्रपती संभाजीराजेंचे चरित्र काही घटकांनी चुकीच्या पद्धतीने मांडले होते. त्यांचे वास्तव चित्र, सखोल अभ्यास करून समाजापुढे आणण्याचे काम डॉ. पवार यांनी केले. इतिहासातील वास्तव न मांडता ते विचारधारेतून मांडण्याचे काम काही गटांनी केले आणि वर्षानुवर्षे तोच इतिहास वाचला गेला. डॉ. पवार त्याला अपवाद ठरले. सत्य आणि वास्तव यावर आधारित वस्तुस्थिती समाजापुढे मांडणे ही इतिहासकाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पार पाडली. अशावेळी त्यांनी टीकेला भीक घातली नाही. सखोल अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास समाजासमोर आणला. शाहू महाराज, महात्मा फुले आदी महापुरुषांचे कार्य महाराष्ट्राबाहेर नेणाऱ्या इतिहासकारांमध्ये जयसिंगराव पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेता येण्यासारखे आहे.
मराठ्यांच्या इतिहासातील, विशेषत: स्वातंंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील, व्यक्ती व त्यांची कामगिरी उपेक्षित राहिली आहे. त्यांच्या कार्याची दखल इतिहास लेखनात घेतली गेलेली नाही. छत्रपती राजाराम महाराजांशिवाय रामचंद्र पंडित अमात्य, सेनापती संताजी घोरपडे, धनाजी जाधव, महाराणी ताराबाई अशा अनेक कर्तबगार स्त्री-पुरुषांची कामगिरी अंधारात राहिली होती. मग शिवछत्रपतींनंतर स्वराज्य रक्षणाची धुरा या सर्वांनी सांभाळली त्यांचा इतिहास प्रकाशात आणावा, या कृतज्ञतेच्या भावनेतून डॉ. जयसिंगराव पवार मराठ्यांच्या इतिहासाकडे आकृष्ट झाले, असे त्यांच्या कन्या, इतिहास अभ्यासिका डॉ. मंजुश्री पवार यांनी नमूद केले आहे.
इतिहास संशोधनाला चालना
डॉ. पवार यांनी आपले आयुष्य इतिहास संशोधनाला खर्ची घातले. पण याचबरोबर इतरांनाही इतिहासाचे संशोधन करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यासाठी मूलभूत स्वरूपाचे काम त्यांनी करून ठेवले आहे. १९९२ साली महाराष्ट्रातील इतिहास-अभ्यासकांनी एकत्र येऊन ‘अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदे’ची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. परिषदेच्या एका अधिवेशनात वाचले गेलेले शोधनिबंध पुढच्या अधिवेशनात प्रसिद्ध करण्याचा पायंडा डॉ. पवार यांनी पाडल्यामुळे परिषदेतर्फे आजपर्यंत २२ शोधनिबंध संग्रह प्रकाशित झाले आहेत. डॉ. अप्पासाहेब पवार यांनी शिवाजी विद्यापीठात ‘शाहू संशोधन केंद्र’ या संस्थेची स्थापना केली. राजर्षी शाहूंच्या कारकिर्दीच्या कागदपत्रांचे अनेक खंड केंद्रातर्फे प्रकाशित झाले आहेत. गेली काही वर्षे डॉ. पवार हे आपल्या गुरूने स्थापन केलेल्या या संशोधन संस्थेत फक्त १ रुपया प्रतीकात्मक मानधन घेऊन संचालक म्हणून कार्यरत होते. राजर्षी शाहूंच्या चरित्राशी व आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अशा अनेक ग्रंथांचे प्रकाशन या केंद्रातर्फे त्यांनी ‘राजर्षी शाहू साहित्य माला’ द्वारे केलेले आहे. डॉ. पवार यांच्या या कार्याची नोंद घेऊन २५ हून अधिक सामाजिक व साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले.
कोल्हापूरचा इतिहास प्रकाशात
डॉ. पवार यांच्या ‘ऐतिहासिक व प्राकृतिक’ या खंडामध्ये कोल्हापूरच्या सुमारे २५०० वर्षांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विविध विषयतज्ज्ञांनी १७ लेखांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या प्राचीन व मध्ययुगीन इतिहासासह प्राकृतिक इतिहासाचा वेध घेतला आहे. यामध्ये ब्रह्मपुरी, करवीर नावाची व्युत्पत्ती, कोल्हापूरचे कोट, जिल्ह्यातील किल्ले, शिवकाळ, महाराणी ताराबाई, करवीरकर महाराणी जिजाबाई, १८५७ चा स्वातंत्र्यलढा आणि चिमासाहेब महाराज, करवीर रियासत, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती घराण्यातील कुलाचार, संस्थानातील स्वातंत्र्यलढा, कोल्हापूर भूगोल, वनस्पती संपदा, प्राणी संपदा आणि पक्षी संपदा या विषयांवरील लेखांचा समावेश या खंडात आहे. डॉ. पवार यांनी यानिमित्ताने कोल्हापूरचा इतिहास ग्रंथाच्या रूपाने महाराष्ट्रासाठी एक पथदर्शक स्वरूपाचा प्रकल्प सादर केला आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी या पुस्तक प्रकाशन समयी व्यक्त केले होते.
