कोल्हापूरमध्ये स्वबळाचा नारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दयानंद लिपारे

 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालानंतर शिवसेनेने स्वबळाचा बाण सोडण्याचा निर्धार करीत उभय काँग्रेसला अडचणीत आणण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. माजी आमदार असा शिक्का बसलेल्यांना पुन्हा आजी आमदार करण्याचा संकल्प खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी (मविआ) भंग पावण्याची पदचिन्हे दिसू लागली आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गेलेली प्रतिष्ठा कमावत आपले स्थान पुन्हा बळकट केले होते. राष्ट्रवादीने दोन्ही जागा कायम राखला होत्या. तर भाजपला खातेही उघडता आले नव्हते. राज्यात मविआ आकाराला येण्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेत या आघाडीने सत्ता स्थापन केली होती. पुढे कोल्हापूर जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ येथेही तिन्ही पक्ष एकत्र नांदले.

जिल्हा बँकेमुळे फूट

 कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा प्रस्ताव अमान्य झाल्यावर शिवसेनेने स्वबळ अजमावून ९ पैकी ३ महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवत ताकद दाखवून दिली. संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, अर्जुन आबिटकर यांच्या यशाने शिवसेनेच्या तंबूत उत्साहाचे वारे संचारले आहे. विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभात खासदार मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पुन्हा सहा जागांवर विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. मंडलिक यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय असे घोषवाक्य घेऊन उघडपणे मंडलिक यांना पाठबळ दिल्यावर सेनेच्या दिशेने वारे फिरले. हसन मुश्रीफ यांचीही छुपी मदत मिळाल्याने मंडलिक यांचा मोठय़ा मताधिक्क्याने विजय शक्य झाला. आता मंडलिक यांनी आमचं नवीन ठरलंय हे घोषवाक्य नव्याने वापरले आहे. शिवसेनेने मागून नव्हे तर लढवून मिळवले आहे, असे म्हणत मंडलिक यांनी उभय काँग्रेसला पर्यायाने काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना ललकारले आहे. परिणामी जिल्ह्यातील मविआवरही प्रश्नचिन्ह उमटले आहे.

शिवसेनेसमोर आव्हान

  राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक मविआच्या माध्यमातून लढवायची की स्वतंत्र याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. या निवडणुका स्वतंत्र लढल्या गेल्या तर शिवसेनेला आपले पूर्वीचे अस्तित्व ठळक करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. एकत्रित निवडणुका लढवायच्या झाल्यास विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने राधानगरीची एक जागा वगळता अन्य जागी काय करायचे, हा प्रश्न शिवसेनेसमोर उभा राहणार आहे. त्याहीपूर्वी लोकसभेला सामोरे जाताना संजय मंडलिक यांना सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या मंत्रिद्वयांची तसेच उभय काँग्रेसमधील सात आमदारांची मदत लागणार आहे. या मदतीचे काय करायचे हा पेच शिवसेनेसमोर उभा राहणार आहे. निर्धार आणि यशाचा संकल्प यात मोठे अंतर राहणार असल्याने ते कसे पार करायचे याचे शिवसेनेसमोर आव्हान असणार आहे.

नवे गणित आकाराला?

  विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार खासदार मंडलिक यांनी केला असला तरी त्यांच्याशी जिव्हाळय़ाचे सबंध असलेल्या उभय काँग्रेसच्या मंत्र्यांची तूर्तास सावध भूमिका दिसते. ‘ शिवसेनेने सहा नव्हे तर दहा आमदार निवडून आणावेत. संजय मंडलिक यांनी नवीन काय ठरवले आहे हे त्यांनाच विचारलं पाहिजे. भविष्यात जनताच काय ते ठरवेल; त्यावर आत्ताच बोलून काय उपयोग, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. याच वेळी मुश्रीफ यांनी शिवसेनेने सहा नव्हे तर जिल्ह्यातील सर्व दहा जागांवर विजय मिळवून आमदार निवडून आणावेत असा टोलाही लगावला आहे. शिवसेना आणि उभय काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील मविआतील एकवाक्यतेला तडा गेला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hopes dashed district bank success ysh
First published on: 14-01-2022 at 00:20 IST