सोलापूर – ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं’, ‘महालिंगरायाच्या नावानं चांगभलं!’ या जयघोषात आणि लोकर व भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत गुरु बिरोबा व शिष्य महालिंगराया यांचा पारंपरिक पालखी भेट सोहळा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथे भाविकांच्या अलोट उत्साहात पार पडला. महाराष्ट्र व कर्नाटकातील सुमारे २० ते २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.
दरवर्षी आश्विन वद्य सप्तमीला हा गुरु-शिष्य भेट सोहळा आयोजित केला जातो. या परंपरेनुसार हुलजंती येथून निघालेली शिष्य महालिंगरायांची पालखी सकाळी गावाशेजारील ओढ्यात विसावली, जिथे भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. दुपारी तीनच्या सुमारास हुन्नूर गावाच्या पश्चिमेकडील बिरोबा मंदिरातून गुरु बिरोबांची पालखी ढोल-ताशांच्या गजरात भेटीच्या मैदानावर दाखल झाली.
सायंकाळी प्रथम गुरु-शिष्य पालखीपुढील मानाच्या बैलांची भेट झाली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी दोन्ही पालख्यांची भेट संपन्न झाली. यावेळी भाविकांनी केलेली भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि आसमंतात घुमणारा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. भेटीनंतर पालख्यांची मिरवणूक हुन्नूर येथील बिरोबा मंदिरात विसावली.
भाकणूक मध्ये वर्तवला पावसाचा अंदाज…
पालखी भेटीनंतर बिरोबा मंदिरात घोंगडे पांघरलेल्या पुजाऱ्यांकडून पारंपरिक भाकणूक सांगण्यात आली. “येत्या अमावास्येपर्यंत सर्वत्र पाऊस पडेल. बैलांची संख्या घटणार असून लाल धान्य भरपूर पिकेल. पाऊस समाधानकारक राहील, राजकीय उलथापालथ होईल. शेळी, मेंढी व बैल सोन्याच्या भावात विकले जातील तसेच अन्नधान्याचे दर वाढतील. नीतिमत्तेने व चांगल्या मार्गाने वागणाऱ्यांचे भले होईल,” असे भाकणुकीत सांगण्यात आले. ही भाकणूक ऐकण्यासाठी शेतकरी व भाविकांनी गर्दी केली होती.
या सोहळ्यास दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक बसवराज पाटील, बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजाराम पुजारी, माजी सरपंच मच्छिंद्र खताळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सहायक पोलीस निरीक्षक ढेरे, उपनिरीक्षक अशोक बाबर व विजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हुलजंतीत ९ नोव्हेंबरला पुढील भेट
या सोहळ्यानंतर सातव्या दिवशी (शनिवार, ७ नोव्हेंबर) कर्नाटकातील शिरढोण येथे, आठव्या दिवशी (रविवार, ८ नोव्हेंबर) मड्डी जकरायाच्या ठिकाणी आणि नवव्या दिवशी म्हणजेच सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी हुलजंती येथे पालखी भेटीचा सोहळा पार पडणार आहे.
