कोल्हापूर : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ आणि देशातील हिंदू विरोधी कारवाया, भारत देशाविरोधी विद्रोह पेटवण्याचे काम करणार्यांच्या विरोधात इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळ पासूनच सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. सायंकाळी मुख्य मार्गावर मानवी साखळीने आंदोलनाची सांगता करण्यात येणार असल्याचे सनतकुमार दायमा, शिवजी व्यास यांनी सांगितले.
बांगलादेश हिंदू बांधवांना त्रास दिला जात आहे. हिंदूच्या हत्या, माता-भगिनींवर बलात्कार आणि सक्तीने धर्मांतर केले जात आहे. या निषेधार्थ आणि भारत सरकारने बांगलादेशातील हिंदुंच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कार्यवाही करावी, बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलावे या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदु समाजाने १६ ऑगस्टला इचलकरंजी बंदचा निर्णय घेतला होता. याला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. मुख्य मार्गावर असणारी वर्दळ थंडावली होती. जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमले होते.अमृत भोसले, प्रवीण सामंत, सुजित कांबळे, प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, कपिल शेटके, अरविंद शर्मा, सर्जेराव कुंभार आदींनी यावेळी बांगलादेशच्या विरोधात घोषणाबाजी केली.
इचलकरंजीतील सर्व व्यापारी, वाहतूकदार, कर्मचारी, शाळा महाविद्यालय, आठवडी बाजार अशा सर्वांनी आपले सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय बंद ठेवून प्रतिसाद दिला.