कोल्हापूर : श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर दिवाळी बाजार भरविण्यास मनाई करण्याचा निर्णय इचलकरंजी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाचा संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे. तथापि त्याची अंमलबजावणी आज शुक्रवारी पहिल्या दिवशी सुरू होत असतानाच विक्रेत्यांमधील मतभेद, वादावादीचे चित्र पुढे आले. काँग्रेस भवन, राणीबाग परिसरात जागा ठरवण्यावरून विक्रेत्यांमध्ये मतभेद झाले होते. घटनास्थळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष आवळे व सहकारी दाखल झाले होते. तर या परिसरामध्ये दिवाळी बाजार भरवण्यास परिसरातील रहिवाशांचा विरोध असल्याचे दिसून आले.

इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या बाजारामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय इचलकरंजी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार दिवाळी सणानिमित्त शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर कोणत्याही परिस्थितीत बाजार भरविण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी गोंधळ

या निर्णयाची अंमलबजावणी आज शुक्रवारी सुरू झाली. तेव्हा सकाळीच विक्रेत्यांमधील मतभेद वाद समोर आले. काही विक्रेत्यांनी अनेक जागा अडवून ठेवल्या आहेत, असा आरोप इतर विक्रेत्यांकडून होत आहे. शिवाय मोक्याच्या जागा ताब्यात घेण्यावर काही व्यापाऱ्यातील काही बड्यांचा डाव असल्याचेही इतर विक्रेत्यांचे म्हणणे आहे. शिवाय, रांगोळी, सजावटीचे साहित्य, खेळणी, फळे, फुल बाजार असे वेगवेगळे स्टॉल कोठे असावेत यावरूनही मतभेद होते. परिणामी विक्रेत्यातील दोन गटांमध्ये शाब्दिक वाद होत होता. अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांच्या समोरच हा प्रकार राणीबागेसमोर सुरू झाल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता.

इचलकरंजीत दिवाळी बाजारावरून राडा; जागेच्या वादात पहिल्याच दिवशी गोंधळ (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

कमाईवर डोळा

दरम्यान, मुख्य बाजार मुख्य रस्ता ऐवजी राणीबाग समोरील रस्त्यावर हा पर्यायी बाजार भरणार आहे. येथील मोक्याच्या जागा कशा पटकावता येतील यावर काही विक्रेत्यांचा डोळा असल्याचे दिसून आले. जागा अडवून ठेवायचे आणि नंतर ती इतर व्यापाऱ्यांना १५ ते २० हजार रुपयांना विकायची, असाही प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे हे प्रकार बंद करून पारदर्शक पद्धतीने स्टॉल विक्रीची जागा निश्चित करावी, अशी मागणी विक्रेत्यातून होत आहे.

अधिकाऱ्यांची इज्जत

जागा निश्चिती वरून एकीकडे विक्रेत्यांमधील मतभेद वादावादीचे चित्र दिसत होते. त्यावरून ते अधिकाऱ्यांकडे दाद मागत होते. अशावेळी अधिकाऱ्यांना इज्जत देणे अपेक्षित असते. परंतु काही जण ” अरे, सुभाष ” असा उल्लेख अधिकाऱ्याचा एकेरी करीत सर्वांच्यासमोर करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अधिकारी हा प्रकार कोणत्या कारणामुळे खपवून घेतात, अशीही चर्चा सुरू होती.

नियोजन कसे आहे?

महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिका प्रशासन व शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत न्यायालयीन आदेश, शहरातील वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता तसेच सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अनधिकृत स्टॉल्स यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.दिवाळी सणाच्या कालावधीत श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर पारंपरिक पद्धतीने कपडे , पणत्या, आकाशकंदील, सजावटीचे साहित्य तसेच विविध वस्तूंच्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात तात्पुरते स्टॉल्स व मंडप उभारण्यात येतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. तसेच पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणी निर्माण होतात. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल, रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मार्ग उपलब्ध होण्यातही अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.या पार्श्वभूमीवर सदर मुख्य मार्गावर बाजार भरविण्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने मुख्य रस्त्यावर बाजार भरविण्यास मनाई करणारे आदेश दिले आहेत. न्यायालयीन आदेशांचे पालन करणे सर्व संबंधितांवर बंधनकारक असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

इचलकरंजीत दिवाळी बाजारावरून राडा; जागेच्या वादात पहिल्याच दिवशी गोंधळ (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी संबंधित विभागांना न्यायालयीन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मुख्य मार्गावर अनधिकृतपणे स्टॉल्स, मंडप अथवा विक्री साहित्य उभारले जाणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महापालिका व पोलीस प्रशासन यांनी परस्पर समन्वय ठेवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळी सण हा आनंदाचा व उत्साहाचा सण असला तरी नागरिकांची सुरक्षितता, सुरळीत वाहतूक व्यवस्था आणि न्यायालयीन आदेशांचे पालन यांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. व्यापारी व विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावर तात्पुरते स्टॉल्स, मंडप अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण करू नयेत. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरातील व्यापारी, फेरीवाले, व्यावसायिक संघटना व नागरिकांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घेऊन महानगरपालिका व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. श्री शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर दिवाळी बाजार भरविण्यास मनाई असल्याने संबंधित विक्रेत्यांनी या मार्गावर स्टॉल्स अथवा मंडप उभारू नयेत. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि न्यायालयीन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही महानगरपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त जबाबदारी असून यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगर पालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, सहा.आयुक्त रोशनी गोडे, सहा.संचालक नगररचना विजय फुलपगारे, शहर अभियंता मधुकर बंडगर, मानसेवी शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर ,पोलीस निरीक्षक शरद मेमाने, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहा पोलिस निरीक्षक विकास शिंदे, सहा आयुक्त सुनिल शिंदे, सहा, आयुक्त नितिन बनगे, सहा आयुक्त सदाशिव गोनुगडे, नगररचनाकार प्रशांत भोसले, विधी अधिकारी भावना देवडा, राज्य परिवहन महामंडळाच्या शिल्पा थोरात, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, अग्निशमन अधिकारी प्रणव कांबळे , महाराष्ट्र सुरक्षा बल पर्यवेक्षक विनायक पाटील, बाजीराव पोवार, संग्राम पाटील आदी उपस्थित होते.