कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा एक अभूतपूर्व आणि क्रांतिकारी बदल पाहायला मिळाला. प्रशासनाने किरकोळ व फिरत्या विक्रेत्यांवर गर्दी नियंत्रणासाठी घातलेली बंदी आणि दुसरीकडे राजकीय, सामाजिक व व्यापारी संघटनांकडून थाटामाटात उभारले जाणारे सुमारे २० स्वागत मंडप, असा विरोधाभास शहरात चर्चेचा विषय ठरला होता.
“शहराचे नियोजन करायचे तर सर्वांना समान न्याय असावा,” अशी ठाम भूमिका घेत गणेश मंडळांनी या स्वागत मंडपांमधून दिला जाणारा निरोपाचा नारळ आणि मानाची पानसुपारी एकमुखाने नाकारत राजकीय पक्ष प्रशासनाला चपराक दिली. समान न्यायाचे तत्व अमलात आणले जावे असा संदेश यातून पेरला गेला.
या ऐतिहासिक निर्णयाला कोणताही गट, तट किंवा पक्ष न मानता बहुतांशी सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी भरघोस पाठिंबा दिला. या बहिष्काराच्या पवित्र्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या वेळी हे राजकीय आणि सामाजिक स्वागत कक्ष अक्षरशः ओस पडले.
उपयोजन हरवले
संयोजकांनी अतिउत्साहात आणलेली श्रीफळे, पानसुपारी, आणि टोप्या जागच्या जागीच पडून राहिल्या. ऐनवेळी आलेल्या या अपेक्षेने तमाम सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना जणू चपराकच दिली आहे. वर्षानुवर्षे मिरवणुकीत शक्तिप्रदर्शन करणाऱ्या आणि आपले महत्त्व प्रस्थापित करणाऱ्या या स्वागत कक्षांचे पुढील वर्षी नेमके भवितव्य काय असणार, असा गंभीर प्रश्न आता आयोजकांसमोर उभा ठाकला आहे. सार्वजनिक मंडळेच जर पानसुपारी घेण्यासाठी थांबणार नसतील, तर हजारो रुपयांची उधळण करून हे मंडप उभारण्याचा उद्देशच काय, असा सतावणारा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. परिणामी, यंदा हे कक्ष केवळ ‘मिरवणूक बघण्याचे ठिकाण’ बनून राहिले होते.
ना खेद ना खंत!
दुसरीकडे, या बहिष्काराचा एक अत्यंत सकारात्मक परिणाम मिरवणुकीवर झाला. गणेश मंडळांमध्ये या स्वागत कक्षांकडे पाठ फिरवल्याने आणि तिथे थांबण्याची तसदी न घेतल्याने मानाचा नारळ किंवा मान-पान न घेण्याची कोणतीही अनमान झाल्याची भावना नव्हती, ना खेद ना खंत दिसून येत होती. स्वागत कक्ष आता मंडळांच्या खिजगणतीतही उरलेले नाहीत हे स्पष्ट झाले. मंडळांनी या कक्षांसमोर देखावे व कलेचे सादरीकरण टाळून न थांबता पुढे जाणे पसंत केल्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक अधिक गतिमान, रूक्षपणाविरहित आणि शिस्तबद्ध पार पडली.
कृतीने आरसा दाखवला
गणेश मंडळांनी घेतलेला हा पवित्रा पाहता त्यांनी आमच्यासारख्या स्वागत कक्ष संयोजकांना मोठा धडा शिकवला आहे. दहा टक्के सुद्धा मंडळांनी पानसुपारी श्रीफळ स्वीकारला नाही, अशी खंत स्वागत कक्षाचे एक संयोजक संतोष कांदेकर यांनी व्यक्त केली. एकूणच, सर्वसामान्य विक्रेत्यांवर निर्बंध आणि राजकीय नेत्यांसाठी पायघड्या अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या यंत्रणेला आणि सत्तेच्या बेड्यात मिरवणाऱ्या राजकीय पक्षांना गणेश मंडळांच्या या कृतीने आरसा दाखवला आहे. यातून राजकीय नेते, पक्ष आणि महापालिका प्रशासन कोणताही बोध घेणार का, की मनमानी निर्णय यापुढेही लादले जाणार, हे आगामी काळच ठरवेल.
यांचे होते स्वागतकक्ष
विसर्जन मार्गावर इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी, मारवाडी युवा मंच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दै. राष्ट्रगीत, श्री साईप्रसाद ग्रुप, क्रेडाई व बिल्डर्स असोशिएशन, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, शिवसेना युवासेना पुरस्कृत ताईसाहेब फौंडेशन, आरपीआय, हिंदु एकता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवगर्जना सेवाभावी संस्था, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सतेज फायटर, बहुजन समाज पार्टी, इचलकरंजी फेस्टिव्हल असे विविध स्वागत कक्ष उभारण्यात आले होते.
