कोल्हापूर: इचलकरंजी लगत असणाऱ्या कबनूर या गावात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सुरू असताना एका जिहादी महिलेकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी शिवीगाळ करीत बॅनर फाडण्यात आले असल्याने कडक कारवाई करण्यात यावी, महापुरुषांविषयी अनुद्गार काढणाऱ्यांवर कडक कायदा अमलात आणावा, पोलीस प्रशासनाने हिंदुत्ववादी तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे आदी मागण्यासाठी शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलक संतापलेचे दिसून आले.

या मोर्चाचे नेतृत्व आमदार राहुल आवाडे, आमदार संग्राम जगताप यांनी केले. या दोघांनीही महापुरुषांविषयी अनुद्गार काढणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच लव जिहाद विरोधी कायदा संमत करण्यात यावा यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ग्वाही दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्र नगरी असणाऱ्या इचलकरंजी भर उन्हात निघालेल्या या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी विविध संघटनांचे कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका, तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे आंदोलन स्थळी आंदोलकांनी पेक्षा पोलिसांचेच गर्दी अधिक प्रमाणामध्ये दिसत होती. बलिदान मास सुरू असल्याने तसेच मुस्लिमांचे रोजे उपवास सुरू असल्याने अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी पुरेशी दक्षता घेऊन कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

इचलकरंजी येथील कबनूर गावात एका महिलेने ईदची लायटिंग करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा फलक फाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संतप्त हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधित महिलेच्या घराची तोडफोड केली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून जनजीवन पूर्वपदावर आली आहे.

पोलिसांनी फलक फाडणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला असला तरी, दगडफेक आणि राडा केल्याप्रकरणी तब्बल ५३ हिंदू तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी चौघांना अटकही करण्यात आली आहे. विटंबनेचा निषेध करणाऱ्या तरुणांवर अन्यायकारक गुन्हे दाखल झाले असून, ते तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी आक्रमक भूमिका सकल हिंदू समाजाने घेतली आहे. या प्रमुख मागणीसाठीच आजचा हा मोर्चा काढण्यात आला होता.
निषेध मोर्चा इचलकरंजीतील शिवतीर्थ (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा) येथून निघाला. तळपत्या उन्हातही मोर्चात सहभागी होण्यासाठी शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. बलिदान मास सुरू असल्याने अनेकांनी पादत्राणे वापरण्याचे टाळले आहे. अशांच्या पायांना, तळव्यांना तापलेल्या रस्त्याचे चटके बसत होते. तरीही ते सहन करीत भारत माता की जय, वंदे मातरम, ज्यांना पाहिजे टिपू सुलतान त्याने जावे पाकिस्तान अशा घोषणा सुरू ठेवल्या होत्या.

महात्मा गांधी पुतळा इथे पोचल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी गजानन महाराज गुरुजी, आमदार संग्राम जगताप, आमदार राहुल आवाडे यांची प्रामुख्याने भाषणे झाली. महापुरुषांविषयी अनुद्गार काढणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच लव जिहाद विरोधी कायदा संमत करण्यात यावा यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ग्वाही दोन्ही आमदारांनी दिली.