कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या विरोधात काल भाजपच्या माजी आमदार सुरेश हाळवणकर गटाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. तर आज याच मुद्द्यावरून इचलकरंजी त्याच्या विरोधातील चित्र पाहायला मिळाले.

पल्लवी पाटील यांच्या उत्कृष्ट कार्यकौशल्यामुळे शहरातील अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. त्यामुळे आयुक्त पाटील यांची बदली होऊ नये, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या एका गटाचे समर्थक नगरसेवकांनी आमदार राहुल आवाडे यांना शुक्रवारी निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. आयुक्तांची बदली या विषयावरुन भाजपातील अंतर्गत संघर्ष आता उघड झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आयुक्त पल्लवी पाटील यांची बदली होऊ नये यासाठी आता आवाडे गटही सक्रीय झाला आहे. मंगळवारी होणार्‍या बैठकीसाठी आवाडे समर्थक नगरसेवक मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे समजते.

आमदार राहुल आवाडे हे महानगरपालिकेत विविध विकासकामांच्या आढावा बैठकीसाठी आले असताना स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कार्यकौशल्यामुळे शहरातील अनेक महत्वांकाक्षी प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झालेले आहेत. नागरिकांना सोयी सुविधा तातडीने उपलब्ध करुन देणेबाबतची त्यांची कार्यकुशलता कौतुकास्पद असल्याने त्यांचा कार्यकाळ कायम ठेवावा, अशी मागणी करत या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वेळ मिळवून द्यावी, अशी विनंतीही केली आहे. यावेळी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेवक प्रकाश दत्तवाडे, राजू बोंद्रे, सुशांत कलागते, योगेश पाटील, दत्ता मांजरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

निवेदनात, आयुक्त पल्लवी पाटील या महानगरपालिकेमध्ये दीड वर्षापासून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी अनेक महत्वांकाक्षी प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण केले आहेत. सध्याही भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजना, नाट्यगृह नुतनीकरण, गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर वाचनालय बांधकाम, घनकचरा प्रकल्प आदी शहराच्या व नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची कामे प्रगतीपथावर आहेत.

महानगरपालिकेतील बहुसंख्य सदस्य हे नवोदीत असतानाही सर्वांना विश्‍वासात घेऊन  आयुक्त व प्रशासन शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र काही विघ्नसंतोषी मंडळी केवळ स्वार्थासाठी प्रशासनावर ठपका ठेवत त्यांच्याबद्दल दिशाभूल करणारी माहिती  पसरवत आहेत. ही बाब शहराच्या दृष्टीने भूषणावह नाही. त्यामुळे आयुक्त पाटील यांचे उत्कृष्ट कार्य कौशल्यामुळे शहराच्या विकासला गती मिळत असल्याने त्यांचा कार्यकाळ पुढे सुरु ठेवण्यात यावा, अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणावी, अशी मागणी केली आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांनी पदाचा कार्यभार फेब्रुवारी २०२५ मध्ये स्वीकारला.नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर आणि शहराची स्वच्छता व सुशोभिकरणावर विशेष भर राहिला आहे. प्रशासकीय कामकाजादरम्यान काही स्थानिक राजकीय घडामोडींमुळे त्या चर्चेत आल्या आहेत.