कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेमध्ये गेले तीन दिवस आयुक्तपदाच्या आट्यापाट्याचा खेळ रंगला आहे. तर आजची सकाळ अधिकृत आयुक्त कोण? यावरून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वाद रंगला. साताऱ्याहून आलेल्या पल्लवी पाटील यांनी आपल्याला आदेश नसण्याचे सांगत आयुक्त पदाच्या खुर्चीवर दावा केला. तर ओमप्रकाश दिवटे यांनी स्थगिती मिळाली असल्याचे सांगून हा पदभार आपल्याकडे असल्याचे स्पष्ट केले. अखेर मंत्रालयातून फोन आल्यानंतर या खुर्चीवर ओमप्रकाश दिवटे हे स्थानापन्न झाले.

हेही वाचा – शक्तिपीठ महामार्ग रद्द करा; हातकणंगले तालुक्यात महापुराचा धोका वाढल्याची भीती

हेही वाचा – आमिर खानचा मुलगा प्रदर्शनापूर्वी गाजू लागला; ‘महाराज’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन

इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना बदलण्यासाठी एक राजकीय यंत्रणा कार्यरत होती. त्यातून दोन दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी साताऱ्याच्या पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांनी येऊन पदभार स्वीकारला होता. तथापि त्यानंतर ओमप्रकाश दिवटे यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटने पुन्हा दिवटे यांच्याकडे सूत्रे सोपवण्याचे आदेश काल सायंकाळी दिले होते. त्यानुसार आज दिवटे महापालिकेत गेले. पण तत्पूर्वीच पल्लवी पाटील या आयुक्त पदाच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्या होत्या. त्यावरून अधिकृत आयुक्त कोण ? यावरून वाद सुरू झाला. अखेर मंत्रालयातून फोन आल्यानंतर दिवटे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. मात्र यावरून आज सकाळीच महापालिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यातील वादाची चांगली चर्चा सुरू होती.