कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेतील भाजप अंतर्गत वादाचे लोन आज कोल्हापुरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचले. कोल्हापुरात एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीवेळी नगरसेविकांनी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून होत असलेल्या अवमानकारक वागणुकीचा पाढा वाचण्यात आला. पाटील यांची बदली करण्यात यावी अशी मागणी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. नगरसेवकांची संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांनी गट तट न करता सामंजस्याने वागण्याची गरज व्यक्त केली. आयुक्त पल्लवी पाटील यांना समज देण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
इचलकरंजी महापालिकेमध्ये भाजप अंतर्गत नगरसेवकातील वाद तापला आहे. आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा गट आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यातील गट यामध्ये तेढ निर्माण झाली आहे. कचरा संकलनाच्या २२ कोटीच्या निविदेवरून हा वाद वाढला आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हाळवणकर गटाने विरोध केल्याने हा विषय नामंजूर करण्यात आला होता. तर दोन दिवसापूर्वी झालेल्या महापालिकेच्या सभेमध्ये हा विषय आवाडे गटाने बहुमताने मंजूर केला होता. या सभेस हाळवणकर गटाचे नगरसेवक तसेच विरोधी गटाचे नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. या निविदेवरून आवाडे – हाळवणकर गटाच्या नगरसेवकांमध्ये धुसफूस आहे. तर, या गटाच्या नगरसेविका आयुक्तांकडून मिळणाऱ्या वागणुकीवरून नाराज आहेत. भाजपचे निरीक्षक विक्रम पावसकर यांनी हाळवणकर गटाच्या नगरसेवकांसमवेत एक बैठक घेतली होती. तरीही हा वाद धुमसत आहे.
या पार्श्वभूमीवर आज माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवक, नगरसेविकांनी कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांचे भेट घेतली. या भेटीबळी नगरसेविका आक्रमक झाल्या होत्या. महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील या नगरसेविकानाचं नव्हे तर महिला सभापतीनाही कशाप्रकारे अवमानास्पद वागणूक देतात याचा सविस्तर पाढा वाचण्यात आला. आयुक्त पाटील यांनी नगरसेविकांना उद्देशून ” माझ्याशी वाकडं तर नदीवर लाकडं ” अशा पद्धतीने धमकावल्याची माहितीही मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली.
यावेळी भाजप ग्रामीण अध्यक्ष राजवर्धन नाईक, उप महापौर अनिल डाळ्या, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन, माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड, माजी शहर अध्यक्ष अमृत भोसले, शहाजी भोसले, मनोज हिंगमिरे, मारुती पाथरवट, इम्रान बागवान, सचिन माळी, जहांगीर पटेकरी यांच्यासह हाळवणकर गटाचे नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, इचलकरंजीत गट तट न करता महापालिकेमध्ये एकत्रितपणे काम करावे. महापालिकेच्या आयुक्तांना समज देण्यात येईल. हा विषय पक्षाच्या वरिष्ठांना कळविण्यात येईल. इचलकरंजीचा विकास होण्यासाठी नगरसेवकांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. इचलकरंजीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून नगरसेवकांमध्ये समन्वय ठेवण्यात येईल. प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही याबाबत स्पष्ट सूचना दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
