कोल्हापूर : आगामी निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने नेत्यांनी त्यांच्या विजयासाठी झटलेल्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा. कार्यकर्त्यांनीही आपापसातील मतभेद बाजूला ठेवून इचलकरंजी महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी एकमेका सहाय्य करू, अशी भूमिका घेऊन सर्वच जागांवर कमळ फुलवावे, असे आवाहन नगरविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी केले.

भाजपच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पूर्व, पश्चिम व ग्रामीण मंडलच्या नियुक्त पदाधिकाऱ्यांना पत्रांचे वाटप व कार्यमेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प्रास्ताविकात आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेत ६५ पैकी ५० पेक्षा अधिक जागा भाजपाला मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी आवाडे-हाळवणकर यांच्यात एकजूट असून, संभ्रमापासून दूर रहावे. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी मिळेल, असे सांगितले. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आमच्यात मतभेद नाहीत, तसा कोणी प्रयत्न करेल तोच अडचणीत येईल, असा इशारा दिला. राज्यात पहिली महिला बुथ कमिटी असणारे इचलकरंजी हे पहिले शहर असल्याचेही त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन जिल्हा चिटणीस शेखर शहा, अध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी आभार मानले.