कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर कोण होणार याची उत्सुकता वाढली असताना गुरुवारी विरोधकांच्या शिवशाहू आघाडीने महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. सत्ताधाऱ्यांपेक्षा निम्मे संख्याबळ असतानाही विरोधकांच्या आघाडीने महापौर, उपमहापौर निवडण्याचे धाडस कसे केले त्याची चर्चा होत असताना याबाबत आज एक खळबळजनक विधान आघाडी करून करण्यात आले.

भाजप अंतर्गत आवाडे – हाळवणकर यांच्यातील वादाचा फायदा शिवशाहू आघाडीला होऊन आमचा महापौर निवडला जाऊ शकतो, अशी शक्यता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य, नगरसेवक मदन कारंडे यांनी व्यक्त केली आहे. यामुळे भाजप अंतर्गत नेमके काय सुरू आहे याची चर्चा होत आहे. तथापि भाजपकडून मात्र सर्व नगरसेवक एकसंघ असून विरोधक गैरसमज पसरवत आहेत. त्यांना मनातले मांडे मनातच खावे लागेल हे महापौर निवडीच्या दिवशी सोमवारी स्पष्टपणे दिसेल, असे सांगितले गेले आहे. या डाव्या प्रति दाव्यामुळे अनपेक्षितपणे इचलकरंजी महापालिकेची महापौर निवड लक्षवेधी बनली आहे.

विरोधकांच्या शिवशाहू विकास आघाडीकडून गुरुवारी आघाडीकडुन महापौरपदासाठी सयाजी चव्हाण तर उपमहापौर पदासाठी संगिता आलासे यांचे अर्ज दाखल करण्यात आले.

इचलकरंजीचे महापौरपद हे इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. महापालिकेच्या ६५ पैकी १७ जागा जिंकलेल्या शिव-शाहु विकास आघाडीने महापौर-उपमहापौर पदाची निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला असून आघाडीच्या बैठकीत महापौर पदासाठी सयाजी चव्हाण, उपमहापौर पदासाठी संगिता आलासे यांच्या नांवावर एकमत करण्यात आलें. त्यानुसार आज महापालिकेत दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.

सत्ताधाऱ्यांच्या गटबाजीचा फायदा?

यावेळी नगरसेवक मदन कारंडे यांनी भाजपमधील आवाडे-हाळवणकर अांतर्गत गटबाजीचा आम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे ही निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी शशांक बावचकर, सागर चाळके, गटनेते उदयसिंग पाटील, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, रणजित जाधव आदी उपस्थित होते.

भाजपची शुक्रवारी घोषणा

ओबीसी प्रवर्गातून महायुतीचे २७ नगरसेवक निवडुन आले आहेत. पहिला महापौर करण्याबाबत एकमत होत नसल्याने वरिष्ठ नेत्यांच्या बैठकावर बैठका होत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज भाजपचे गटनेते विठ्ठल चोपडे यांनी दोन्ही पदासाठी प्रत्येकी २ अर्ज नेले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील हे उद्या महापौर, उपमहापौर पदाच्या नावाची घोषणा करणार असून नंतर उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. सोमवारी (९ फेब्रुवारी ) महापौर निवडीसाठी सभा होणार आहे.