कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील विविध प्रलंबित नागरी प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच महापालिका प्रशासनाने जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे यासह विविध नागरी प्रश्नांसाठी विरोधी महाविकास आघाडीच्या वतीने महापालिकेसमोर उपोषण करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या उदासीन व निष्क्रिय कारभाराचा तीव्र शब्दांत धिक्कार करण्यात आला. जोरदार घोषणाबाजीने चौक दणाणून सोडला. दरम्यान, उपमहापौर अनिल डाळ्या, सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी उपोषणस्थळी जात मागण्या, समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच सर्व नागरी सुविधांची पूर्तता होईल, अशी ग्वाही दिली.
शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी, आरोग्य, वाहतूक व्यवस्था तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांमुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नागरी सुविधा मिळाव्यात, शहराचा विकास व्हावा या हेतूने इचलकरंजीकरांनी भाजपा महायुतीला एकहाती सत्तासूत्रे दिली. सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी सत्ताधारी आणि प्रशासन यांना नागरिकांशी काही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. नागरी हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर, मदन कारंडे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, उदयसिंग पाटील, संजय तेलनाडे आदींनी केला.
शहरातील खड्डेमय रस्ते, कचरा संकलन, अस्वच्छता आणि महापालिकेच्या कारभाराविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील नागरी समस्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. बावचकर यांनी महापालिका प्रशासन, आयुक्त, महापौर आणि आमदारांच्या भूमिकेवर टीका करत आमदार राहुल आवाडे यांच्या हस्तक्षेपामुळे महापालिका प्रशासनाची दुर्दशा झाल्याचा आरोप केला. नगरसेवक तेलनडे यांनी शहरातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आमदार राहुल आवाडे यांच्यावरही टीका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदारांविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत नागरिकांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. जनतेच्या करातून महापालिकेचा कारभार चालत असताना नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी आंदोलन करण्याची वेळ येणे दुर्दैवी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रलंबित नागरी प्रश्नांवर ठोस आणि कालबद्ध उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून अधिक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. उपोषणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते.
