कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या विकासकामांसाठी आमदार राहुल आवाडे यांनी आणलेल्या निधीवरून त्यांचे अभिनंदन करण्याच्या ठरावावरून महापालिकेच्या सभेत सत्तारुढ – विरोधकांच्यात गदारोळ उडाला. यानंतर अनेकांचा नामोल्लेख करीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र महापालिकेच्या विकासासाठी भरीव योगदान आर्थिक सहकार्य करणारे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा सेनेपासून सर्वांनाच विसर पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रारंभी रवी रजपुते यांनी शहराच्या विकास निधीवरून आमदार राहुल आवाडे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावर आक्षेप घेत विरोधी पक्ष नेते उदयसिंग पाटील यांनी याच कारणासाठी खासदार धैर्यशील माने यांचेही अभिनंदन करावे, अशी सूचना केली. यावर सत्तारुढ – विरोधकांच्यात शाब्दीक चकमक घडली.
घाऊक अभिनंदन
रवींद्र माने, रजपुते, तानाजी पोवार, मदन कारंडे, उदयसिंग पाटील, संजय तेलनाडे, राजू बोंद्रे, सयाजी चव्हाण, विठ्ठल चोपडे आदींनी मते व्यक्त केली. सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, विरोधी पक्ष नेते सजेत पाटील, आमदार जयंत पाटील, आयुक्त पाटील असा घाऊक अभिनंदनाचा ठराव करण्यावर एकमत झाल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला.
महिला महोत्सव दणक्यात
महिला महोत्सव विषयावर ध्रुवती दळवाई, अलका स्वामी, क्रांती आवळे, संगिता आलासे, पद्मजा सावरतकर, सरीता आवळे, तेजश्री भोसले, विद्या साळुंखे, सुरेखा जाधव, सारिका पाटील आदींनी आयुक्त पल्लवी पाटील यांचे अभिनंदन केले. निधीची कमतरता भासू न देता महिला महोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय महापौर उदय धातुंडे यांनी जाहीर केला.
घटलेली पटसंख्या
महानगरपालिका शाळांत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरफाळ्यातील संयुक्त करात सवलत देण्याच्या विषयावर सत्तारुढ – विरोधी नगरसेवकांनी महापालिका शाळांच्या दुरावस्था आणि दर्जाच्या बाबतीत तीव्र मते नोंदवली. उपमहापौर अनिल डाळ्या, तेजश्री भोसले, रणजीत जाधत्त, अविनाश कांबळे, विठ्ठल चोपडे, सचिन राणे, अभिजीत वाळवेकर, प्रदीप धुत्रे, इम्रान बागवान, अमरजित जाधव, सयाजी चव्हाण, मदन कारंडे, परवेज गैबान आदींनी विद्यार्थी घटलेल्या पटसंख्येवरून प्रशासनाने आत्मपरिक्षण करावे. सोयी सुविधा, सवलत जरूर देऊ मात्र शैक्षणिक दर्जाचे काय असा सवाल केला. अखेरीस महापौरांनी संयुक्त करात ५ टक्के देण्याचा निर्णय जाहीर केला. विषय पत्रिकेचे वाचन नगरसचिव राहुल पोटे यांनी केले.
