कोल्हापूर : इचलकरंजीतील पंचगंगा नदीला सध्या पूर आला असून नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठावरील अनेक भागात पाणी पोहोचले असतानाही इचलकरंजी शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी पूरस्थितीची पाहणी करत महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

“एकीकडे पंचगंगा नदीत मुबलक पाणी उपलब्ध आहे, तर दुसरीकडे शहरवासीयांना एक दिवसाआडही पाणीपुरवठा सुरळीत करता येत नाही. ही प्रशासनाची मोठी अपयशाची बाब असून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे,” असा आरोप पाटील यांनी केला.इचलकरंजी शहराला सध्या मजरेवाडी आणि पंचगंगा नदीवरील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन कट्टीमोळ येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र पाणी उपसा केंद्र उभारण्यात आले. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे केंद्र सध्या बंद अवस्थेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली योजना वापरात नसल्याने सार्वजनिक निधीचा योग्य उपयोग होत नाही. ऐन पावसाळ्यात, नदीला पूर आलेला असताना देखील नागरिकांना चार-चार दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे,” असेही ते म्हणाले.

नियोजनाचे अपयश

उन्हाळ्यात नदीतील पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येणे समजू शकते. मात्र सध्या नदीला मुबलक पाणी असतानाही शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणे हे नियोजनातील अपयश असल्याची टीका त्यांनी केली. बंद असलेले कट्टीमोळ पाणी उपसा केंद्र तातडीने सुरू करून शहराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करावा, तसेच पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

आंदोलनाचा इशारा

दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नागरिकांमध्येही तीव्र नाराजी असून नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे. आगामी काळात पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारली नाही, तर पुन्हा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी गटनेते शिवाजी पाटील, रतन वाझे, मंथन मुदगल उपस्थित होते.

पाणीप्रश्नचा गुंता

इचलकरंजी हे ‘वस्त्रनगरी’ म्हणून ओळखले जाणारे शहर असून, वाढते शहरीकरण आणि औद्योगिक प्रगतीमुळे शहराची पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. इचलकरंजी हे ‘वस्त्रनगरी’ म्हणून ओळखले जाणारे शहर असून, वाढते शहरीकरण आणि औद्योगिक प्रगतीमुळे शहराची पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी हा चिंतेचा विषय आहे. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणे, जेणेकरून नागरिकांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी मिळेल, हे प्रशासनाचे मुख्य काम आहे.