कोल्हापूर : इचलकरंजी आणि परिसरातील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या ( जॉब वर्क) मजुरी मध्ये ५२ पिकाला २६ पैसे (केंब्रिकसाठी) वाढ देण्याचा निर्णय सोमवारी सर्वानुमते घेण्यात आला. पुढील तीन वर्षे ही वाढ कायम राहणार असून याची अंमलबजावणी १ एप्रिल पासून पूर्वलक्षी केली जाणार आहे. तर इतर प्रकारच्या कापडासंदर्भात मजूरीवाढ ट्रेडींगधारक व यंत्रमागधारक यांच्य पातळीवर घेतला जाईल. प्रांत कार्यालयात माजी आमदार सुरेश हाळवणकर, पुंडलिक जाधव यांची शिष्टाई यशस्वी ठरली. एक महिन्यापासून सुरु असलेले आंदोलन संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले.

गेल्या १३ वर्षापासून मजुरीवाढ न मिळाल्याने महिन्याभरापासून खर्चीवाले यंत्रमागधारकांनी यंत्रमाग बंद आंदोलन सुरु केले होते. या आंदोलन काळात वेगवेगळी आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. तर काही भागात यंत्रमागाची बिमे कापण्यात आली होती. मजूरीवाढ संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व जिल्हाधिकार्‍यांच्या सुचनेवरुन प्रांत कार्यालयात बैठकाही झाल्या. पण त्यामध्ये ठोस निर्णय न झाल्यान या प्रश्‍नी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मध्यस्थी करत संयुक्त बैठक घेतली होती. त्यामध्ये ८ जूनपर्यंत आंदोलन स्थगित ठेवून त्यामध्ये सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सोमवारी होणार्‍या बैठकीत निर्णय न झाल्यास सामुहिक आत्मदहनाचा इशारा यंत्रमागधारकांनी दिला होता. बैठकीच्या अनुषंगाने सोमवारी सकाळी यंत्रमागधारक मोठ्या संख्येने प्रांत कार्यालयात जमले होते. प्रांताधिकारी दीपक शिंदे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, यंत्रमागधारक प्रतिनिधी पुंडलिक जाधव, शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे, धर्मराज जाधव, विश्‍वनाथ मेटे तर ट्रेडींगधारक चंदनमल मंत्री, रामपाल भंडारी, ओमप्रकाश दरक, ओमप्रकाश काबरा, तुर्चीमल खंडेलवाल, रामसुख जाजुंदा यांच्यात चर्चा झाली. मजुरीवाढ प्रश्‍नावरुन दोन्ही बाजूंनी मते ऐकून घेण्यात आली. आणि सर्वानुमते तोडगा काढत तसा करार करण्यात आला.

अर्धा पैशाची वाढ

या संदर्भात हाळवणकर यांनी, १३ वर्षांपूर्वी ५२ पिकाला १३ पैसे वाढ करण्यात आली होती. त्यानंतर ही सगळ्यात मोठी वाढ म्हणजे २६ पैशांची वाढ झालेली आहे. इचलकरंजीतही सध्या प्रोसेस बंद असून जागतिक युद्ध परिस्थितीमध्ये मंदीची परिस्थिती असताना ट्रेडिंगवाल्यांनी यंत्रमागधारकांच्या चळवळीचा मान ठेवत ही वाढ दिली आहे. मागील मजुरीत अर्धा पैसा इतकी वाढ देण्यात आली आहे. ही वाढ केंब्रिकसाठी असून धोती, मोठी नक्षी, मोठा पन्ना, वेगवेगळ्या क्वालिटीच्या ज्या मजुरी आहेत, ते ट्रेडिंग कंपनीवाले आणि कारखानदारांच्या समन्वयातून त्यांच्या त्यांच्या पातळीवर निर्णय करायचा आहे. त्यामध्ये या करारामुळे कोणतीही बाधा येणार नाही. यंत्रमागधारक आणि ट्रेडिंगधारक प्रतिनिधींनी एकमताने या करारावर सह्या केल्या असून एकमताने त्याला मान्यता दिली, असल्याचे सांगितले.

आनंद आणि हिरमोड

आजच्या बैठकीमध्ये मोर्चा मजुरीत अर्ध्या पैशाची वाढ झाली आहे तथापि काही नाती किमान दोन रुपये अपेक्षित होती यामुळे आजच्या निर्णयावर काहींनी समाधान व्यक्त केले तर काहींचा हिरेमोड झाला.