कोल्हापूर : पंचगंगा प्रदुषणास जबाबदार धरुन दोन महिन्यापासून इचलकरंजी शहरातील प्रोसेस बंद असल्याने कापड व्यवसायाचे प्रचंड नुकसान होत आहे. हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याने योग्य तो तोडगा काढून उद्योग सुरु करावा, या मागणीसाठी बुधवारी प्रोसेसधारकांसह कामगारांनी कुटुंबासमवेत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

रोजी-रोटी व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला तर संपूर्ण कुटुंबासह प्रांत कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडून असा इशारा देण्यात आला.पंचगंगा प्रदुषणास जबाबदार धरुन इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगाला लक्ष्य केले जात आहे. आंदोलकांच्या मागणीमुळे दोन महिन्यांपासून प्रोसेस उद्योग बंद ठेवण्यात आल्याने उद्योग अडचणीत येण्यासह हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. प्रोसेस सुरु कराव्यात या मागणीसाठी प्रोसेसधारक आणि कामगारांनी राजर्षी शाहू पुतळा येथून मोर्चा काढला. मुख्य मार्गावरुन जोरदार घोषणाबाजी करत तो प्रांत कार्यालयासमोर आल्यानंतर निदर्शने करण्यात आली. शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात उपरोक्त प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.

मोर्चात यावेळी बापूसाहेब तेरदाळे, संदीप मोघे, श्रीनिवास बोहरा, अजित टारे, बाळूशेठ मर्दा, संभाजी लोकरे, अजित डाके, विजय मेटे, शिवानंद बन्ने, सुधाकर पाटील आदींसह प्रोसेसधारक तसेच शिवाजी भोसले, प्रदिप साहू, दशरथ मोहीते, राजेंद्र बचाटे, नरसिंह पारीक, मंगल सुर्वे, कुबेर मगदूम आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

निवेदनात, शहरातील प्रोसेस उद्योगाला लक्ष्य केले जात असून प्रोसेस युनिट बंद झाल्यामुळे धोती व्यवसायात अडचणी निर्माण होण्यासह नुकसान सहन करावे लागत आहे. धोती उद्योग हा हजारो कामगार व व्यापार्‍यांच्या उपजिविकेचा प्रमुख स्त्रोत आहे. पण उद्योगच बंद राहिल्याने व्यापार्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. इचलकरंजी हे धोती निर्मितीचे केंद्र असून नाहक आंदोलनामुळे व्यावसायिकांवर विश्‍वासार्हता गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पर्यावरणीय नियमांचे पालन करत योग्य तो तोडगा काढून प्रोसेस लवकर सुरू करण्यात याव्यात. या संदर्भात महानगरपालिका किंवा संबंधित विभागाच्या होणार्‍या बैठकीची पूर्वसूचना देण्यासह व्यापारी प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, असे नमुद केले आहे. यावेळी बापूसाहेब तेरदाळे, संदीप मोघे, श्रीनिवास बोहरा, अजित टारे, बाळूशेठ मर्दा, संभाजी लोकरे, अजित डाके, विजय मेटे, शिवानंद बन्ने, सुधाकर पाटील आदींसह प्रोसेसधारक उपस्थित होते.

तर राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटना (इंटक) यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात, भोगावतीपासून शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधार्‍यापर्यंत पंचगंगा प्रदूषित झाली आहे. नदीकाठावरील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे मैला मिश्रीत सांडपाणी साखर कारखाने व औद्योगिक वसाहतींचे सांडपाणी व अन्य घटकांमुळे पंचगंगा प्रदूषित झाली आहे. प्रदूषण कमी व्हावे म्हणून शासनाचे प्रयत्न चालू असून जेवढी शेती आहे तितकीच इंडस्ट्री चालवण्याचा प्रयत्न चालू आहे. केवळ प्रोसेस उद्योग टार्गेट करुन आंदोलन चालू आहे. परिणामी प्रोसेस बंद पडत असून त्याचा परिणाम कामगार व कुटुंबावर होत आहे. हा उद्योग जिवंत ठेवायचा असेल तर पर्यावरण समतोल राखून तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवाजी भोसले, प्रदिप साहू, दशरथ मोहीते, राजेंद्र बचाटे, नरसिंह पारीक, मंगल सुर्वे, कुबेर मगदूम आदी उपस्थित होते.