कोल्हापूर : इचलकरंजीतील गावभाग परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील माणकापूर शिवारात धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मंदार रानडे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजीतील गुजरी पेठ येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय मंदार रानडे या युवकाचा हुपरी रोडवरील कर्नाटक हद्दीतील सीमेवर निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेरदाळे यांच्या उसाच्या शेतात मंदार याचा मृतदेह आढळून आला.

हल्लेखोरांनी आधी त्याच्या डोळ्यांत चटणी टाकली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

शेतामध्ये काही महिला कामासाठी गेल्या असताना त्यांना मृतदेह पडलेला दिसून आला. त्यांनी तत्काळ शेतमालकाला याची माहिती दिली. शेतमालकाने सदलगा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सदलगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

असा झाला हल्ला

मृत तरुणाची ओळख इचलकरंजीतील गुजरी पेठ येथील रहिवासी मंदार रानडे अशी पटली आहे. मंदार पौरोहित्य करत होता. एका लग्नविधी साठी म्हणून त्याला पंचगंगा नदी पलीकडे असलेल्या मानकापूर फाटा येथे बोलावून घेण्यात आले होते. तेथे तो दुचाकीवरून गेला होता. गाडीवर मागे बसलेल्या तरुणाने चेहरा मुखपट्टीने झाकला होता. काही अंतर पुढे गेल्यानंतर मागे बसलेल्या तरुणाने मंदारच्या डोळ्यात चटणी फेकली. धारदार हत्याराने वार केले. हल्ला होत असताना मंदारने घरी मोबाईल वरून मारहाण होत असल्याची माहिती दिली. याच वेळी त्याच्या किंचाळण्याचा आवाजही आला. तर हल्लेखोराने कुटुंबीयांना फोन करून ‘ मंदारला संपवले ‘ असा निरोप दिला होता ल, असेही सांगितले जात असल्याचे कळते.

खुनाचे कारण गुलदस्त्यात

तथापि ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केली, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. आरोपींचा शोध घेण्याचे काम सदलगा पोलीस करत आहेत.

मृत्यूनंतरही हाल

सदलगा येथे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरगाव येथे घेण्यात आला. परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने मृतदेह पुन्हा सदलगा पोलीस ठाण्यात रुग्णालयाकडे रात्री नेण्यात आला होता.