कोल्हापूर : वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात सध्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या तसेच जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. शहराच्या विविध भागांत रस्ते खोदाई करून ठेवले असताना मुसळधार पावसामुळे चिखल पसरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ‘ चिखलकरंजीचा विकास कधी होणार? ‘ असा उपरोधित संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शहरांतर्गत भुयारी गटार योजना राबवताना कामाचे योग्य नियोजन नसल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मुख्य रस्ते असोत किंवा गल्ल्या, कंत्राटदाराने जागोजागी खोदकाम करून ठेवले आहे. अनेक ठिकाणी पाइपलाइन टाकून झाल्यानंतर रस्ते पूर्ववत न केल्याने खड्डेमय झाले आहेत.
भररस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे, चिखलामुळे दुचाकीस्वारांचे, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे अपघात नित्याचे झाले आहेत. विकास हवा आहे, पण तो लोकांचे जीव धोक्यात घालून नको, अशी भावना आता इचलकरंजीतील प्रत्येक नागरिक व्यक्त करत आहे.
रस्ते अरुंद झाल्यामुळे आणि खोदाईच्या मातीचे ढिगारे रस्त्यावरच असल्याने वाहतुकीची कोंडी दररोज होत आहे.आता पावसाळ्याचे दिवस असल्याने या उघड्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून ते डबक्यांचे स्वरूप घेत आहे.
महापौरांचे आदेश
रस्ते खोदाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापौर उदय धातुंडे यांनी संबंधित मक्तेदार एल.सी. कन्स्ट्रक्शन, गुजरात यांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक घेतली. सध्या सुरू असलेली नवीन रस्ते खोदाईची कामे तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. रस्ते खोदाई पूर्ण झाली आहे, त्या सर्व ठिकाणी पॅचवर्कची कामे तातडीने हाती घेऊन ती युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
अधिकाऱ्यांवर कारवाई
महापौरांनी महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक व मुकादम यांच्याकडून शहरातील रस्ते खोदाईची सविस्तर लेखी माहिती मागवून घेतली. वेळेत माहिती सादर केली नाही, अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील पॅचवर्कची कामे अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण शहराचे चार झोनमध्ये विभाजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र मक्तेदार नियुक्त करून पॅचवर्कची कामे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
या चारही झोनमधील कामांचे समन्वय, नियंत्रण आणि नियमित देखरेखीची जबाबदारी उपमहापौर अनिल डाळ्या यांच्याकडे देण्यात आली असून, कामांचा दररोज आढावा घेऊन नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे हे महानगरपालिकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रस्ते खोदाई व पॅचवर्कच्या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. संबंधित मक्तेदार व जबाबदार अधिकारी यांनी कामात कसूर केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा महापौरांनी यावेळी दिला.
