कोल्हापूर : नवी दिल्ली येथील भारत टेक्स या यंदाच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात मोठ्या संख्येने खरेदीदार उपस्थित होते. इचलकरंजी दालन मध्ये नवीन उत्पादने आणि उत्पादकांबरोबर अनेक व्यवहार पूर्ण झाले. आगामी हंगामासाठी अनेक वस्त्र उद्योजकांकडे नवे कापड खरेदीदार आकर्षित झाले. त्यांच्याकडून कापड खरेदीची आगाऊ नोंदणी ( बुकिंग) करण्यात आली.

भारतटेक्स मध्ये इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चरर असोसिएशन यांच्या वतीने इचलकरंजी पॅव्हिलियनचे विशेष दालन उभारण्यात आले होते. भारत मंडपच्या विस्तीर्ण परिसरामध्ये उद्योजकांनी आपली उत्पादने उच्च प्रतीमध्ये आणि आकर्षक पद्धतीने सादर केली होती.

इचलकरंजीच्या वस्त्रउद्योगाला नव्या तंत्रज्ञानासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्याचा हा सलग दुसरा वर्षाचा महत्त्वाचा प्रयत्न होता. भारतटेक्स सारख्या व्यासपीठांमुळे वस्त्रोद्योगातील इचलकरंजी मुद्रा ( ब्रँड ) सशक्त होऊन उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि भविष्यातील नवीन उत्पादनांविषयी जाणून घेण्यासाठी उत्तम संधी मिळाली. या प्रदर्शनात इचलकरंजीचे २६ उद्योजकानी स्वतःचे स्टॉल उभारून उत्पादनांचे प्रदर्शन केले, त्यांना नवीन ऑर्डर्स प्राप्त झाल्या. व्यापार, नवीन मंड्या व निर्यातीशी संबंधित संधींमध्ये लक्षणीय वाढ झाली असे इचलकरंजी शटललेस फॅब्रिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गोयल यांनी सांगितले.

मान्यवरांच्या भेटी

इचलकरंजी पॅव्हिलियनला केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त कार्तिकेय ढांडा, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार अशोक माने, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, चंद्रकांत पाटील, गोरखनाथ सावंत, संजय खोत, सुनील पाटील आदींचा समावेश आहे.

मागील समृद्ध अनुभव

नवी दिल्ली येथे गेली तीन वर्ष भारत टेक्स या नावाचे प्रदर्शन वस्त्र विषयक प्रदर्शन भरत आहे. यापूर्वीही देशात सूत, कापड, तयार कपडे (गारमेंट), लोकर, रेशम, ताग तसेच यंत्रसामग्री आदी वेगवेगळ्या उत्पादनांची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शन होत असत. परंतु संपूर्ण वस्त्रोद्योगाचे एका छताखाली प्रदर्शन भरवण्याची कल्पना पुढे आली. त्यातून २०२४ साली पहिले प्रदर्शन भरवण्यात आले. तेव्हा इचलकरंजीतील निवडक कापड उत्पादक वस्त्रोद्योजक त्यामध्ये सहभागी झाले होते. गेल्या वर्षी खास इचलकरंजीतील वस्त्रोद्योजकांसाठी इचलकरंजी पॅव्हेलियन असा असे स्वतंत्र दालन देण्यात आले होते. त्यातील विविधांगी कापड उत्पादनाचा दर्जा, पोत, रंगसंगती, रचना ( डिझाइन) या बाबी पाहून देशविदेशातील कापड खरेदीदारांना वस्त्रनगरीच्या उत्पादनाची महती पटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आदींनी इचलकरंजी पॅव्हेलियनला आवर्जून भेट देऊन कौतुक केले होते. शिवाय, इचलकरंजीचा वस्त्रोद्योग वाढावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.