सातारा : जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी एका व्यावसायिकाला महसूल प्रशासनाने १ हजार ब्रास मुरूम उत्खननाची मंजुरी दिली. परंतु व्यावसायिकाने या मर्यादेचे उल्लंघन करत संपूर्ण डोंगरच पोखरल्याचा प्रकार सातारा तालुक्यातील सज्जनगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात समोर आला आहे.
सज्जनगडच्या परळी खोर्यातील बोगद्यापलीकडील परिसर, केळवली, सांडवली आणि ठोसेघर भागात सध्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार सुरू आहेत. सज्जनगडच्या पायथ्याशी असणार्या परळी खोर्यातील अंबवडे खुर्द येथे जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी एका व्यावसायिकाला महसूल विभागाने १ हजार ब्रास उत्खननाची मंजुरी दिली होती. मात्र, व्यावसायिक फायद्यासाठी परळी खोर्यातील निसर्गसंपन्न भूप्रदेशाची प्रचंड तोडफोड सुरू आहे. अवैध प्रकाराला महसूल विभागातील काही अधिकार्यांचे पाठबळ असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे पाण्याचे प्रवाह बदलून शेती, रस्ते आणि वस्त्यांना मोठा धोका निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आंदोलनाचा इशारा
महसूल विभागाने अवघ्या १ हजार ब्रास मुरूम-माती उत्खननाची परवानगी दिली असताना, प्रत्यक्षात तेथे संपूर्ण डोंगर पोखरल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महसूल विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी, मोजणी व पंचनामा करून वस्तुस्थिती स्पष्ट करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
अंबवडे खुर्द येथे एका व्यावसायिकाला १ हजार ब्रास उत्खननाची मंजुरी दिली असताना त्याहून मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याची तक्रार आली आहे. चौकशी केल्यावर अतिरिक्त उत्खनन झाले असल्याचे सिद्ध झाल्यास कडक कारवाई केली जाईल. – आशीष बारकुल, प्रांताधिकारी, सातारा.
सपाटीकरणाच्या नावाखाली परळी खोर्यातील निसर्गरम्य डोंगरच पोखरला जात आहे. यामुळे भविष्यात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या गैरप्रकाराची चौकशी करून तत्काळ काम थांबवावे आणि दोषींवर कडक कारवाई करावी. – बापू वांगडे, स्थानिक ग्रामस्थ, अंबवडे खुर्द, ता. सातारा
