कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवबंधन बांधणारे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दोघे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आहेत. शिवसेनेमध्ये भूकंप झाला असताना सेनेचे पाच माजी आमदार गोवा सहलीची मजा लुटत असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. दोन्ही खासदारांनी बुधवारी ‘वर्षां’वर हजेरी लावली. मात्र इचलकरंजीतील खासदारांचे समर्थक ठाकरे यांच्या समर्थन आंदोलनात दिसले नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणावर परिणाम होताना दिसत आहेत. आगामी राजकीय हालचाली नेमक्या कोणत्या दिशेने होणार, त्यामध्ये आपला राजकीय लाभ कसा होणार यावर नजर ठेवून राजकीय हालचाली केल्या जात आहेत. आगामी निवडणुकीत निवडून येण्याच्या दृष्टीने कोणते समीकरण अधिक उपयुक्त ठरणार यावर सर्वाचा भर दिसत आहे.

मंत्री, आमदार यांचा धक्का

मंत्री शिंदे यांच्यासोबत असलेल्यात जिल्ह्यातील दोन प्रमुख नावे म्हणजे राजेंद्र पाटील-यड्रावकर व आमदार आबिटकर. निधिवाटप आणि मतदारसंघातील समीकरणे मतदारसंघातील विधानसभेची समीकरणे लक्षात घेऊन आबिटकर हे शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांनी ते उद्धव ठाकरे यांच्यासमोर सोबतच राहणार असल्याचे सांगत आहेत. आमदार आबिटकर यांचा संपर्क होत नसल्याने त्यांची नेमकी भूमिका कोणती हे कळावयास मार्ग नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवबंधन बांधल्यानंतर त्यांना ठाकरे यांनी पाच

खात्यांचे राज्यमंत्री केले. तरीही ते शिंदे यांच्यासमवेत गेल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. नव्या राजकीय घडामोडींमध्ये शिंदे

यांच्या शब्दांस महत्त्व राहणार असल्याने राजकीय फेरबदल काही झाला तरी आपले मंत्रिपद कायम राहावे, अशी त्यांची रणनीती दिसत आहे.

माजी आमदारांचा संभ्रम

शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पाच माजी आमदार गेले ३ दिवस गोवा येथे सहलीचा आनंद लुटत असून त्यांच्यावर शिंदे यांच्या बंडाचा कसलाच परिणाम झाल्याचे दिसत नाही. त्यांनी आपण शिवसेनेसोबत असल्याचे म्हटले आहे; पण तसे दर्शवणारी देहबोली त्यांच्या कृतीतून दिसत नाही. पाच माजी आमदारांना शिवसेना-भाजप यांची युती होणे राजकीयदृष्टय़ा फायदेशीर ठरणार आहे. मात्र त्याबाबत ते काही बोलत नाहीत. दोन दिवसांनंतरही हे पाचही जण अद्याप कोल्हापुरात पोचलेले नाहीत.

खासदार कोणाबरोबर?

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार आहेत. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी बुधवारी ‘वर्षां’वर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत बैठक झाल्याचे नमूद करून आपण त्यांच्यासमवेत राहणार असल्याचे सांगितले. ठाकरे यांच्यासोबत राहणे फायदेशीर असल्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसतो. आमदार प्रकाश आबिटकर हे त्यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. तेसुद्धा ठाकरे यांच्यासमवेत असतील, असाही दावा मंडलिक करीत आहेत. दुसरे खासदार धैर्यशील माने यांनीही आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपण ठाकरे यांच्यासमवेत असल्याचे यांचे म्हणणे आहे. तथापि आज इचलकरंजी शहरात शिवसेना जिल्हाप्रमुखांनी ठाकरे यांच्या समर्थनासाठी आंदोलन केले. त्याकडे माने समर्थक नगरसेवकांनी पाठ फिरवली. रुग्णाची प्रकृती पाहणीसाठी गेलो असल्याचे दोघा नगरसेवकांनी सांगितले. मात्र ही कारणे तकलादू वाटत आहेत. त्यामुळे माने हे नेमकी कोणती भूमिका घेणार ही लक्षवेधी ठरले आहे.

पदाधिकारी ठाकरेंसमवेत

कोल्हापूर जिल्ह्यातील संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव या तिन्ही जिल्हाप्रमुखांसह बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी समर्थन आंदोलन चालवले आहे. शिंदे यांच्या बंडानंतर कोल्हापुरात शिवसेनेच्या दृष्टीने काही जमेचे तर काही उणे अशी परिस्थिती आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impact of eknath shinde rebellion on shiv sena politics in kolhapur district zws
First published on: 24-06-2022 at 00:12 IST