कोल्हापूर : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदी हसन मुश्रीफ असण्याचे दोन फायदे बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याला मिळाले. कागल येथे नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, तसेच उत्तुर येथे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय सुरू करण्यास बुधवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आयुर्वेदाचा पायाभूत सिध्दांत स्वास्थस्य स्वास्थ्य रक्षणम् साध्य करण्यासाठी राज्यातील आरोग्य सेवेतील आयुर्वेद तज्ज्ञांची आवश्यकता लक्षात घेऊन कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्याची आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र शासनाच्या व भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांच्या मान्यतेच्या अधीन राहून कागल येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली. तर उत्तुर (ता. आजरा) येथे ६० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय योग्य व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित ६० खाटांच्या रुग्णालयास मंजुरी देण्यात आली आहे. हेही वाचा : शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुन्हा राज्यव्यापी आंदोलन याबाबत मुश्रीफ म्हणाले, की माझ्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालय यांसाठी निकषानुसार किमान ३ एकर जागा निश्चित केली आहे. केंद्रीय संस्थेद्वारा नोंदणीकृत योग व निसर्गोपचार विषयक शिक्षण देणारी (पदविका / प्रमाणपत्र कोर्स) व उपचार करणारी एकुण ५ संस्था (केंद्रीय व खाजगी) राज्यात कार्यरत आहेत. सदर केंद्रीय व खाजगी संस्था या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी बी.एन.वाय.एस. साठी विहीत केलेला पदवी अभ्यासक्रम राबवत नाहीत. तसेच, महाराष्ट्र राज्यात योग व निसर्गोपचार पदवी अभ्यासक्रमाचे एकही शासकीय महाविद्यालय नाही. यास्तव उत्तुर, ता.आजरा, कोल्हापूर येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित ६० रुग्णखाटांचे रूग्णालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक असणारी पदे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने भरण्यास मान्यता देण्यात आले आहे. या शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व त्यासाठी आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.