कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द न करता तो केवळ स्थगित केला असल्याने हा महामार्ग संपूर्णत: रद्द करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात होत आहे. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (१२ ऑगस्ट) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. लवकरच संयुक्त किसान मोर्चा, राज्यस्तरावरील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी परिषद तसेच तुळजापूर येथे ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांचे साखळी उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे विधान परिषद गटनेते, आमदार सतेज पाटील, समन्वयक गिरीश फोंडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, के. डी. पाटील, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील,आनंदा पाटील,युवराज पाटील, नितीन मगदूम, तानाजी भोसले, युवराज शेटे, नवनाथ पाटील, कृष्णा भारतीय, श्रीपाद साळे, अजित बेले पाटील यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेही वाचा : बांगलादेशातील अस्थिरता भारतीय वस्त्रोद्योगाच्या पथ्यावर पर्यावरणास हानी पोहोचवणारा गोवा ते नागपूर हा शक्तिपीठ महामार्ग महायुती शासन पुढे रेटत आहे. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे महाराष्ट्र सरकारची लाडकी योजना आहे, अशी टीका करून पाटील म्हणाले, की गेल्या तीन महिन्यांपासून बारा जिल्ह्यांमध्ये शेतकरी, नागरिक हे शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री दादा भुसे यांनी हा महामार्ग रद्द न करता स्थगिती दिल्याचे जाहीर केले होते. तथापि दुसरीकडे गावागावांमध्ये भूसंपादनाची नोटीस चावडीमध्ये येणे सुरूच राहिले होते. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत व शेतकऱ्यांना एकीकडे स्थगिती दिली आहे असे सांगत व दुसरीकडे त्यांना अंधारात ठेवत महामार्ग रेटण्याची प्रक्रिया पुढे चालू ठेवली आहे. याच्याही पुढे जात आता हा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. त्यावरून शासन फसवणूक करीत असल्याचे सिद्ध होत असल्याने वरीलप्रमाणे आंदोलनाची तीव्रता वाढवत नेऊन शेतकरी शासनाला सळो की पळो करून सोडतील. शक्तिपीठ महामार्ग तत्काळ विनाअट रद्द करावा. अन्यथा लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत देखील महायुतीच्या उमेदवारांना याची फळे भोगावी लागतील, असा इशारा देण्यात आला. हेही वाचा : Ceropegia Shivarayina : विशाळगडावरील ‘कंदीलपुष्प’ या नव्या प्रजातीच्या वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव! वाचा सविस्तर… कोल्हापुरात ज्या पद्धतीने महापूर आला व त्याचा नागरिकांना व शेतीला फटका बसला यामध्ये विविध रस्त्यांचे बांधकाम हे एखाद्या बंधाऱ्यासारखे केले आहे याचा मोठा वाटा आहे. या महापुरामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांना व नागरिकांना वाऱ्यावरती सोडले. शक्तिपीठ महामार्ग झाल्यास महापुरात भर पडणार आहे. त्यामुळे पुन्हा आता या पद्धतीचा लोकांच्या कोणत्याही उपयोगाचा नसलेला व कंत्राटदारांचे भले करणारा महामार्ग आम्हाला नको आहे असे गिरीश फोंडे यांनी सांगितले.