कोल्हापूर : येथे राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद सोमवारी होवून शाश्वत विकास परिषदेमधून कोल्हापूरला शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीचे मॉडेल म्हणून उदयास येण्यासाठी घोषणापत्राची निर्मिती चर्चासत्रानंतर करण्यात आली. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) मार्फत कोल्हापूर जिल्हयात सयाजी हॉटेलमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हयात विकासाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या विभागांसमवेत उद्योजकांनी सामंजस्य करार केले.

परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ‘ मित्र ‘ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जागतिक बँकेचे अधिकारी विजय के., आयुक्त वस्त्रोद्योग अवश्यंत पांडा, जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस. , सहसचिव प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : कोल्हापूर: मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक निवेदन सादर; शासन आदेशाची होळी, माणगाव येथे आंदोलक – पोलीसांच्यात झटापट

प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. प्रविणसिंह परदेशी यांनी मित्र संस्थेची कार्यपद्धती उपस्थिततांना सांगितली. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर क्रेडाई कोल्हापूर आणि ॲडव्हेन्चर टुरीझम ऑपरेटर यांचे सोबत पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार मान्यवरांच्या उपस्थित झाले. उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, पर्यटन, वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया या पाच विषयांवर चर्चासत्र झाले. यात सहभागी होण्यासाठी जिल्हयाबाहेरील तसेच जिल्हयातील नमंकित उद्योग , व्यावसायिक सहभागी होते.

विकासासाठी कोल्हापूर जिल्हा सर्वोत्तम – पालकमंत्री हसन मुश्रीफ

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मानले. कोल्हापूरच्या विकासाचा पाया आणि विकासाला गती देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. शाहू मील, उद्यमनगरी, कृषी, क्रीडा अशा अनेक मार्गातून जिल्हयाला शाश्वत विकासाची सुरूवात करून दिली. त्यामुळेच आजही हा जिल्हा प्रत्येक क्षेत्रासाठी गुंतवणूक करण्यासाठी चांगला असून विकासासाठी सर्वोत्तम जिल्हा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगलीत येणाऱ्या पुर निवारणासाठी नुकतेच ३२०० कोटी रूपये जागतिक बँकेकडून मिळणार आहेत. भविष्यात यामुळे या सर्व शहरात पूर येणारच नाही असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता विकासाला बाधा येणार नाही. जिल्हयातील दरडोई उत्पन्न अडीच लाखाहून सहा लाखांपर्यंत न्यायचे आहे. यातून कोल्हापूर जिल्हा देशात अग्रक्रमांकावर नेण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा : बिद्री कारखान्याचा डिस्टलरी परवाना रद्द; के. पी. पाटील, हसन मुश्रीफ यांना धक्का

टेक्नीकल पार्कसाठी शेंडा पार्कमधे २० एकर जागा मिळणार – कार्यकारी अध्यक्ष, राजेश क्षीरसागर

कोल्हापूर जिल्हयातील तरूणवर्ग शिकून नोकरीसाठी मुंबई पुण्याकडे जातो. आपल्या जिल्हयात त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सामाजिक दृष्टीनेही या विषयाकडे पाहिले पाहिजे. टेक्नीकल पार्क उभारणीसाठी किमान २० एकर जागा हवी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून जागेबाबतचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेंडा पार्क मधील २० एकर जमीन टेक्लीकल पार्कसाठी उपलब्ध होईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. यातून जिल्हयातील रोजगार वाढणार असून युवकांना जिल्हयातच नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल. तसेच जिल्हयात कन्वेंशन सेंटर उभारणीसाठी २५० कोटीही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. हद्दवाढ जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचा विषय आहे तसेच कोल्हापूर खंडपीठ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच मंजुरी दिलेल्या ३२०० कोटींमधून जिल्ह्यातील पुरस्थिती नाहीशी होईल. ईव्हीएम आणि एयरोस्पेस पार्ट्स मधील उद्योगांना चालना देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : ‘बिद्री’च्या इथेनॉल प्रकल्पावरील कारवाईचा कामगारांकडून निषेध; काळ्या फिती लावून दिवसभर कामकाज

मित्राचे सीईओ प्रविणसिंह परदेशी यांनी जिल्हा केंद्रबिंदू मानून विकास करणे शक्य असल्याचे सांगितले. युवकांमधील कौशल्य वाढ शैक्षणिक काळातच होणे आवश्यक असल्याचेही ते आपल्या मनोगतामध्ये म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समन्वयक डॉ.अरुण धोंगडे यांनी प्रयत्न केले. परिषदेचे सूत्रसंचलन समीर देशपांडे, चारुदत्त जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मानले.