कोल्हापूर : श्री शंभू तीर्थाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त वस्त्र नगरी इचलकरंजी मध्ये इतिहास, परंपरा आणि श्रद्धेने भरलेला भव्य कार्यक्रम पार पडला. विविध ढोल पथक, ताशा पथक आणि ध्वज पथकांनी तब्बल एक हजार ढोल-ताशांच्या निनादात हजारों शंभू भक्तांच्या साक्षीने छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पण सोहळ्यानिमित्त शहरात विविध धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दररोज होत असलेल्या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. रविवारी झालेल्या कार्यक्रमात स्वयंभू, शिव शंभू, ब्रह्मांडनायक, छत्रपती शासन, केसरी, हिंदवी स्वराज्य, शिवप्रेमी आणि वाद्य संस्कार यांसारख्या पथकांनी भाग घेतला. युवक, युवती आणि महिलांनी पारंपरिक ढोल वादनाची प्रात्यक्षिके सादर करून वातावरण भारावून टाकले. तसेच कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज मर्दानी खेळ पथकाने विशेष प्रस्तुती देत प्रेक्षकांची दाद मिळवली.
स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन यांनी ध्वज पूजन केले. आमदार राहुल आवाडे यांनी ढोल पूजन, तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते शस्त्रपूजन पार पडले. यावेळी रवींद्र माने, मदन कारंडे, सागर चाळके, तानाजी पोवार, संजय कांबळे, सुहास जांभळे, संजय तेलनाडे, प्रकाश मोरबाळे आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शंभू तीर्थपासून महात्मा गांधी चौकापर्यंत संपूर्ण परिसर जनसागराने फुलून गेला होता.
याप्रसंगी माय फाउंडेशनतर्फे १० हजार लाडू प्रसादाचे वितरण, तर विविध संघटनांनी पाणी व्यवस्थेची सोय केली होती. कार्यक्रमाचे नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांनी केले. तर सकाळच्या सुमारास धर्म रक्षा महायज्ञात हजारो नागरिकांनी सहभाग घेत धर्मरक्षण, राष्ट्रभक्ती आणि गौसेवेची शपथ घेतली. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील महायज्ञ यांच्या हस्ते पार पडला, तर महायज्ञाचा समारोप आमदार राहुल आवाडे यांनी केला. या महायज्ञाच्या आयोजनात ब्राह्मण युवा मंच, इचलकरंजीचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी गौरी नावाच्या गाईचे पूजनही करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्याने इचलकरंजी शहरात धर्म, पराक्रम, संस्कृती आणि शिवभक्तीची ऊर्जा पुन्हा जागवली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आगमनानिमित्त शहरात आयोजित केलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका नागरिकांच्या उत्साहामुळे अधिक रंगतदार होत आहे. त्याच कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी सायंकाळी शहराच्या मुख्य रस्त्यावर ‘श्वासात राजं, ध्यासात राजं’ हा भव्य ऐतिहासिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक, धारकरी आणि शंभूभक्तांनी उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाची मांडणी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथांवर आधारित होती. पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार यांसारखे ऐतिहासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध गायक अवधूत गांधी, अभिनेत्री स्मिता शेवाळे आणि प्रसिद्ध आर. जे. राहुल यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांना भावूक करत वातावरण भारावून टाकले.
‘श्वासात राजं ध्यासात राजं’ हे गीत आणि ‘शिवबा राजं, युगत मांडली’ या गाण्यावर प्रेक्षकांनी जल्लोषात दाद दिली. कार्यक्रमात महाराजांचे किस्से, प्रसंग, इतिहास आणि प्रेरणादायी विचारांचा समावेश होता. या कार्यक्रमामुळे शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले. स्वराज्यातील धैर्य, त्याग आणि पराक्रम यांचा थरार अंगावर रोमांच उभे करणाऱ्या सादरीकरणातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला.कार्यक्रमाची सुरुवात तुळजाभवानीच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी आमदार राहुल आवाडे, स्मारक समिती अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी, दिग्पाल लांजेकर, कुंतीलाल पाटनी आणि मोश्मी आवाडे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी तर प्रस्तावना ॲड. समीर मुदगल यांनी केली.
